प्रजासत्ताक दिनी सोलापूर जिल्ह्यात आठ लाख विद्यार्थी करणार सामूहिक कवायत संचालन

सोलापूर : जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय भावना, शिस्त, आरोग्य जागृती व देशभक्तीचा संस्कार रुजवण्यासाठी एक ऐतिहासिक व प्रेरणादायी निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये देशभक्तीपर गीतावर आधारित सामूहिक कवायत संचलन कार्यक्रम मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात येणार आहे.
यापूर्वी 15 ऑगस्ट 2025 – स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यातील सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनाच्या शासकीय व खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी अशाच प्रकारचा कवायत संचलन कार्यक्रम आयोजित करण्याबाबत शासनाने निर्देश दिले होते. त्याच धर्तीवर हा उपक्रम राबविण्यात येत असून, विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना अधिक बळकट करण्याचा उद्देश आहे.
या कार्यक्रमाचा मुख्य हेतू विद्यार्थ्यांमध्ये
शारीरिक तंदुरुस्ती, व्यायामाची आवड, शिस्त, एकोप्याची भावना व देशभक्तीची जाणीव निर्माण करणे हा आहे.
प्रत्येक तालुक्यात सामूहिक कवायतीसाठी 3 शाळांची नियुक्ती करण्यात आली असून, गाव व शहरातील मैदानाच्या क्षमतेनुसार विद्यार्थी एका मैदानावर एकत्र करून कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. मैदानावर पांढऱ्या रंगाचे पट्टे, हिरवी चटई तसेच देशभक्तीमय सजावट करण्यात येणार असून वातावरण पूर्णपणे राष्ट्रप्रेमाने भारलेले असेल.
या भव्य उपक्रमामध्ये सोलापूर जिल्ह्यातील ४७०० हून अधिक शाळांचा सहभाग असणार असून, तब्बल ८ लाख विद्यार्थी सामूहिक कवायत संचलनात सहभागी होणार आहेत. हा उपक्रम जिल्ह्यातील शालेय इतिहासातील एक अभूतपूर्व व आदर्श उपक्रम ठरणार आहे.
या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी (शिक्षण) तसेच सर्व पर्यवेक्षीय यंत्रणा यांचे काटेकोर नियोजन सुरू असून,
विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, शिस्त व आरोग्याची जाणीव निर्माण करण्यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वास प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी व्यक्त केला आहे.



