सोलापूर : घरगुती सोलार सिस्टीमच्या ऑनलाईन अर्जास मंजुरी देण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारल्याप्रकरणी महावितरणच्या सहायक अभियंत्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई जुळे सोलापूर येथे करण्यात आली असून आरोपीविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाणे, सोलापूर शहर येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव लोकसेवक अमित विलासराव रेडेकर (वय ४२) असे असून ते महावितरण शाखा कार्यालय, जुळे सोलापूर येथे सहायक अभियंता (वर्ग-२) म्हणून कार्यरत आहेत. सध्या ते फ्लॅट नं. ५०२, गॅलेक्सी अपार्टमेंट, सिंधु विहार, जुळे सोलापूर येथे वास्तव्यास असून त्यांचे मूळ गाव रेडेकर गल्ली, उचगांव, ता. करवीर, जि. कोल्हापूर हे आहे.
तक्रारदार हे ग्राहकांच्या मागणीनुसार घरावर सोलार सिस्टीम बसविण्याचे काम करतात. जुळे सोलापूर येथील एका ग्राहकाच्या घरावर ३.५ किलोवॅट क्षमतेची सोलार सिस्टीम बसविण्यासाठी त्यांनी महावितरणकडे ऑनलाईन अर्ज केला होता. हा अर्ज मंजूर करण्याची जबाबदारी आरोपी अमित रेडेकर यांच्याकडे होती. मात्र, अर्जास मंजुरी देण्यासाठी प्रति किलोवॅट एक हजार रुपये याप्रमाणे तीन किलोवॅटसाठी तीन हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप तक्रारदाराने केला.
याबाबत तक्रारदाराने दि. २३ जानेवारी २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर कार्यालयात तक्रार दाखल केली. त्यानंतर त्याच दिवशी पडताळणी करण्यात आली असता आरोपी अमित रेडेकर यांनी तीन हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार दि. २४ जानेवारी २०२६ रोजी सापळा रचण्यात आला. सापळ्यादरम्यान आरोपीने तक्रारदाराकडून ३,००० रुपये स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडले.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ (सुधारित) कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया विजापूर नाका पोलीस ठाणे, सोलापूर शहर येथे सुरू आहे. सदर कारवाई शैलेश पवार, पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली असून पुढील तपास प्रशांत चौगुले, पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर हे करीत आहेत.

More Stories
रेड कार्पेट; सोलापूर झेडपी अध्यक्ष निवडीची जय्यत तयारी
सांगोल्यात दहावीच्या भूगोलच्या पेपरची चोरी; तरीपण ठरल्याप्रमाणे विद्यार्थ्यांची परीक्षा होणार
अखेर.. सोलापूर झेडपीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष ठरले