सोलापूरजिल्हा परिषद

राजश्री शाहू वस्तीगृहाचे अनुदान वसुलीचे पुन्हा काढले आदेश

“सोलापूर समाचार’ इफेक्ट

सोलापूर: बंद असलेल्या वस्तीगृह चालकांनी अनुदान लाटल्याच्या तक्रारीबाबत जिल्हा परिषदेच्या जिल्हा समाजकल्याण अधिकाऱ्याच्या आदेशाला उत्तर पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखविल्याचे वृत्त “सोलापूर समाचार’ ने प्रसिद्ध केल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे.

याबाबत येदा तुकाराम दुपारगुडे व सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष सुरेश सिद्रामप्पा हसापुरे यांनी राजश्री शाहू महाराज मागासवर्गीय मुलांचे वस्तीगृह बंद असताना अनुदान लाटल्याबाबत तक्रार केली होती. या तक्रारीवरून तत्कालीन जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुलोचना सोनवणे यांनी उत्तर सोलापूर तालुका पंचायत समितीच्या बीडीओंना तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. पण आत्तापर्यंत याबाबत काहीच कार्यवाही झाल्याचे दिसून आले होते. राजश्री शाहू महाराज मुलांचे वसतीगृह सोलापूर हे वसतीगृह बंद असून या वसतीगृहाची चौकशी करुन त्यांना देण्यात आलेले अनुदान वसूल करुन या संस्थेवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. या संस्थेची मान्यता रद्द करण्यात यावी, असे आदेश देण्यात आले होते.

तत्कालीन जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुलोचना सोनवणे यांनी दिलेल्या या आदेशाला उत्तर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी केराची टोपलीत दाखविल्याचे वृत्त सोलापूर समाचार मध्ये प्रसिद्ध होताच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी याची गंभीर दखल घेतली. त्यांनी या प्रकरणाचा अहवाल सादर करण्याच्या सूचना समाज कल्याण विभागाला दिल्या. त्यावर जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्रसाद मिरकले यांनी पुन्हा एकदा या प्रकरणाची चौकशी करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश उत्तर सोलापूर तालुक्याच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीला आता वेग येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button