सोलापूर : परिमंडळ कार्यालयातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, मारहाणीची धमकी देऊन दहशत निर्माण केल्याप्रकरणी जोतिबा धडे याच्याविरुद्ध जोडभावी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
याप्रकरणी आनंद राजेंद्र साळुंके (वय 27, लिपीक, अन्न-धान्य वितरण अधिकारी कार्यालय, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, आरोपी जोतिबा धडे हा दक्षिण तहसील परिसरात शासकीय दस्तऐवज काढून देण्याच्या नावाखाली एजंटचे काम करतो. तो वारंवार कार्यालयात येऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दबाव टाकत असून इतरांसमोर दहशत निर्माण करण्यासाठी शिवीगाळ व धमकी देत असल्याचा आरोप आहे.
दि. 29 जानेवारी 2026 रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास आरोपी कार्यालयात आला व कोणतेही कारण नसताना कर्मचारी वर्गाला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. विरोध केल्यावर आरोपीने सर्व कर्मचाऱ्यांना मारण्याची धमकी दिली. यानंतर फिर्यादीच्या मोबाईलवरून परिमंडळ अधिकारी नंदकिशोर डोके यांना फोन करून त्यांनाही शिवीगाळ व मारहाणीची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. इतकेच नव्हे तर, आरोपी कर्मचाऱ्यांना कार्यालय सुटल्यानंतर मारहाण करण्याची धमकी देत कार्यालयातून निघून गेला. या प्रकारामुळे कर्मचारीवर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शासकीय कामकाजात अडथळा निर्माण झाला आहे.
याप्रकरणी भा.दं.सं. कलम 221, 224, 352, 351(2) अन्वये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल भीमराव पवार यांनी ठाणे दैनंदिनीत नोंद घेतली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

More Stories
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांची नीट परिक्षा केंद्राना भेट
सोलापूरचा बारावीचा निकाल 87%; कॉपीमुक्त अभियानाचा दिसला प्रभाव
बोरामणीत तलवारीने वार करून माय लेकरांसह तिघांचा खून