आषाढी वारीत साक्षरतेची वारी ठरली लक्षवेधी

सोलापूर : शालेय शिक्षण विभागातर्फे गतवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी वारीत साक्षरतेची दिंडी काढण्यात आली. पुण्यापासून काढण्यात आलेल्या या दिंडीचा समारोप पंढरपुरात करण्यात आला.
शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज राजेश भोयर व महिला आयोगाच्या राज्य अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या दिंडीचा समारोप झाला. शिक्षण राज्यमंत्री भोयर यांनी साक्षरता दिंडी, प्रचार प्रसार तसेच येणाऱ्या अडचणी, झालेले उल्लेखनीय कार्य, यापुढे करायचे कार्य याची सविस्तर माहिती दिली. तसेच माध्यमिक शिक्षण विभागाच्या टीमने केलेल्या कार्याचे कौतुक केले. पुढील काळात अधिक चांगले कार्य करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी साक्षरता काळाची गरज असल्याचे सांगितले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप व प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्या टीमने परिश्रम घेतले. पालखी मार्गावर वारकऱ्यांना साक्षरतेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. वारकऱ्यांचे प्रबोधन करण्यासाठी बुलढाण्यातील शिक्षकाचे ‘आई मला शिकायचंय’ या शीर्षकाखालील माय-माऊली प्रतिमेचे नृत्य सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.



