सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेचे 45 कोटी 83 लाखाचे उत्पन्नाचे बजेट जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी सोमवारी सादर केले. यावर्षी जिल्हा परिषदेच्या उत्पन्नात 83 लाखाची भर पडल्याचे जंगम यांनी नमूद केले.
जिल्हा परिषदेची निवडणूक झाल्यानंतर चार वर्षानंतर प्रथमच दोन दिवसात जिल्हा परिषदेत पदाधिकाऱ्यांची गजबज राहणार आहे. जिल्हा परिषदेवर प्रशासकराज असल्याने आतापर्यंत प्रशासकांना बजेट सादर करण्याची संधी मिळाली. एक दिवसानंतर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाची निवड होणार आहे. अशातच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी जिल्हा परिषदेच्या स्वउत्पन्नाचे बजेट सादर केले. मार्च अखेरला काही अवधी शिल्लक राहिलेला असल्यामुळे राज्यातील सर्व जिल्हा परिषदांचे बजेट मंजूर झाले आहेत. 27 मार्च च्या आत जिल्हा परिषदेचे बजेट मंजूर होणे गरजेचे आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्या निवडीनंतर बजेट सत्राच्या मंजुरीला पंधरा दिवसाचा अवधी शिल्लक राहत नसल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी सोमवारी बैठक घेऊन अधिकाऱ्यांसमोर हे बजेट सादर केले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्या अधिकारात पुन्हा काही पुरवणी बजेटमध्ये सुधारणा करता येऊ शकतात.
गतवर्षी जिल्हा परिषदेचे स्वउत्पन्नाचे बजेट 45 कोटीचे होते. यंदा उत्पन्नात 83 लाखाची भर पडल्याचे सीईओ जंगम यांनी नमूद केले. यंदाच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री ग्राम समृद्ध अभियानासाठी एक कोटी दहा लाखाची तरतूद करण्यात आली आहे. महिला बालकल्याण, कृषी, समाजकल्याण, दिव्यांग विभागाकडे वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत असा निधी ठेवण्यात आला आहे. यामध्ये महिला व बालकल्याण विभागासाठी तीन कोटी 25 लाख समाज कल्याण विभागासाठी दोन कोटी 42 लाख दिव्यांग विभागासाठी दोन कोटी तीस लाख कृषी विभागासाठी तीन कोटी 85 लाख पशुसंवर्धन विभागासाठी तीन कोटी वीस लाख पाणी व पुरवठा विभागासाठी दोन कोटी 96 लाख शिक्षण विभागासाठी पाच कोटी 33 लाख आरोग्य विभागासाठी पाच कोटीची तरतूद ठेवण्यात आली आहे. याशिवाय सामान्य प्रशासन विभागासाठी वेगळी तरतूद ठेवण्यात आली आहे. आता पदाधिकारी अस्तित्वात येणार असल्याने नवीन मोटार खरेदी, वाहन खर्च, इमारत दुरुस्ती खर्च यासाठी काही तरतुदी ठेवण्यात आले आहेत. या बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, सूर्यकांत भुजबळ यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
बुधवारी होणार अध्यक्षांची निवड
बुधवार दिनांक 18 मार्च रोजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड होणार आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड होणार आहे. जिल्हा परिषदेच्या सभागृहात सकाळी दहा वाजता नवनिर्वाचित सदस्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी दोन वाजता सर्वसाधारण सभा होणार आहे. अध्यक्षपदासाठी बार्शीच्या वैद्य यांचे नाव चर्चेत आहे.

More Stories
घरकुलाच्या हप्त्यासाठी १२ हजारांची लाच; उंबरगावचे ग्रामसेवक, शिपाई एसीबीच्या जाळ्यात
झेडपी लेखा संघटनेच्या अध्यक्षपदी आनंद जाधव, कार्याध्यक्षपदी सूर्यकांत तोडकरी यांची निवड
झेडपीच्या अर्थ विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करा