सोलापूर : जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापती पदाची निवडणूक बिनविरोध पार पडली. या निवडीनंतर पदाधिकाऱ्यांनी ना जल्लोष केला ना फटाके वाजले. भाजपने हा संयम का पाळला याची चर्चा सर्वत्र सुरू होती.
सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापतीपदी संस्कृती सातपुते, महिला बालकल्याण सभापतीपदी अमृता वाघे तर कृषी व पशुसंवर्धन समिती सभापतीपदी रामाप्पा चिवडशेट्टी आणि शिक्षण व आरोग्य समिती सभापतीपदी चेतनसिंह केदार यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हा परिषदेत येऊन नवीन सभापतींचा सत्कार केला. अशाप्रकारे सोलापूर जिल्हा परिषदेत भाजपचेच सर्व पदाधिकारी झाले आहेत. पण भाजपने याचा जल्लोष साधेपणाने केला. ना जिल्हा परिषदेत हलग्या वाजल्या, ना बँजोची धुन वाजली, ना फाटाके फुटले.
जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतीपदाची निवडणूक शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी निराळी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सकाळी दहा ते दुपारी बारा या वेळेत उमेदवारी दाखल करण्याची मुदत होती. तत्पूर्वी बालाजी सरोवर येथे सर्व भाजप जिल्हा परिषद सदस्यांची पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी बैठक घेतली. या बैठकीनंतर विषय समिती सभापतीपदासाठी उमेदवार जाहीर करण्यात आले. त्यानुसार रामाप्पा चिवडशेट्टी, केदारसिंह सावंत यांनी सर्वसाधारण सभापती पदासाठी तर समाजकल्याण सभापती पदासाठी संस्कृती सातपुते, महिला व बालकल्याण सभापती पदासाठी अमृता वाघे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. दुपारी दोन वाजता सभापती निवडीची प्रक्रिया सुरू झाली. या उमेदवाराविरोधात कोणीही अर्ज दाखल न केल्यामुळे त्यांची निवड बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केले.
उपाध्यक्षांची खाती बदलली
चिवडशेट्टी व केदार यांना कोणते खाते मिळणार याकडे सर्वांचे लक्ष होते. सभापतींच्या निवडीनंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य यांनी खातेवाटप जाहीर केले. यात उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांना अर्थ व बांधकाम खाते, शिक्षण व आरोग्य केदार यांच्याकडे तर कृषी व पशुसंवर्धन सभापती पद चिवडशेट्टी यांना देण्यात आले. कृषी खात्याच्या बऱ्याच योजना राज्य शासनाच्या कृषी खात्याकडे गेल्यामुळे या पदाला चिवडशेट्टी यांची नापसंती होती. त्यामुळे केदार यांनी आपले वजन वापरून शिक्षण व आरोग्य खाते मिळवण्यात यश मिळवले. यासाठी त्यांनी कोणाला फोन केला? याची चर्चा सभागृहात होती. अध्यक्ष वैद्य यांनी चिवडशेट्टी यांच्याकडे कृषी व पशुसंवर्धन खाते असे उच्चारताच त्यांनी शीट म्हणून टेबलावर हात आपटला. मनासारखे खाते न मिळाल्याने नाराज झालेले चिवडशेट्टी ग्रुप फोटो सोडून सभागृृहाबाहेर गेले. यापूर्वी उपाध्यक्ष यांच्याकडे अर्थ व बांधकाम खाते होते. हे खाते कायम राखण्यात इंद्रजीत पवार यांनी यश मिळवले. ही निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सचिन जाधव यांनी केले तर शेवटी उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी आभार मानले.
पालकमंत्र्यांनी विचारले शिक्षण
विषय सभापती निवडीनंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हा परिषदेत येऊन सर्वांचा सन्मान केला. सर्वच खाती व पदाधिकारी भाजपकडे आल्यामुळे खऱ्या अर्थाने जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता आली आहे. त्यामुळे आता सर्वांनी जनतेच्या पसंतीला उतरेल असे काम करा, असा सल्ला त्यांनी नवीन पदाधिकाऱ्यांना दिला. यावेळी त्यांनी नवीन सभापतींची परीक्षा घेतली. त्यांनी सर्वांना शिक्षण काय असे विचारले. सातपुते व चिवडशेट्टी यांनी अभियंता तर वाघे यांनी वकील असल्याचे सांगितले. केदार यांनी मी पदवीधर आहे असे म्हणतात कोणत्या विद्यापीठाचे असा सवाल पालकमंत्री यांनी केला. विद्यापीठ की विषय हेच न समजल्यामुळे केदार हे गडबडले.
यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार राम सातपुते, पक्षनेत्या रश्मी बागल यांच्यासह इतर पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. सत्कार कार्यक्रम संपल्यानंतर पालकमंत्री गोरे यांनी प्रत्येकांच्या कार्यालयात जाऊन सभापतीच्या खुर्चीत बसवले. यावेळी सर्व सभापतींचे कार्यकर्ते आले होते. पण जल्लोष करण्यासाठी गुलाल किंवा फटाके फुटल्याचे दिसून आले नाही. जल्लोष होईल म्हणून हलगीवाले आले होते. पण उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी त्यांना वाद्य वाजवू दिले नाही. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी त्यांना गाडी थांबवून बिदागी दिली.

More Stories
झेडपीच्या महिला बालकल्याण सभापतीपदी अमृता वाघे, समाजकल्याण सातपुते यांच्याकडे
बापरे… मुलांची विमानाने सहल घडविणाऱ्या गुरुजीवर ही काय वेळ आली
सोलापूर जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना मिळणार नवीन गाड्या