सोलापूरजिल्हा परिषद

घरकुल योजनेचा प्रत्येक आठवड्याला घेणार सीईओ कुशल जैन प्रगतीचा आढावा

सोलापूर  : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, सोलापूर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या अध्यक्षतेखाली विविध घरकुल योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा-१ व टप्पा-२, आवास प्लस सर्वेक्षण, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना तसेच मोदी आवास योजना ग्रामीण यांच्या तालुकानिहाय प्रगतीचा बारकाईने आढावा घेण्यात आला.

बैठकीत प्रलंबित प्रकरणे, मंजुरी, हप्ते वितरण, अपूर्ण घरकुले तसेच लाभार्थ्यांच्या अडचणींची सखोल चर्चा करण्यात आली. कोणत्याही प्रकारची दिरंगाई सहन केली जाणार नसून, प्रत्येक प्रलंबित प्रकरण तातडीने निकाली काढून निर्धारित उद्दिष्टे वेळेत पूर्ण करावीत, असे स्पष्ट निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

यापुढे घरकुल योजनांचा आढावा प्रत्येक आठवड्याला घेण्यात येणार असून, प्रत्येक तालुक्याच्या कामगिरीवर सातत्याने लक्ष ठेवले जाणार आहे. उद्दिष्टपूर्तीत हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात येईल. तसेच लाभार्थ्यांना वेळेत घरकुलाचा लाभ मिळावा यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने कार्य करावे, असेही त्यांनी निर्देश दिले. यावेळी प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, चंद्रशेखर जगताप तसेच जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे गटविकास अधिकारी उपस्थित होते. बैठकीत योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button