सोलापूरजिल्हा परिषद

सोलापूर आयटी पार्कसाठी झेडपीचेही राहणार योगदान

सोलापूर : सोलापुरातील प्रस्तावित आयटी पार्कचा काही भाग जिल्हा परिषदेच्या होटगी कार्यक्षेत्रात येत असल्याने सुविधांसाठी जिल्हा परिषदेचे मोठे योगदान राहणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी दिली.

सोलापुरातील तरुणांना रोजगार मिळावे म्हणून जिल्हा प्रशासनामार्फत होटगी परिसरात आयटी हब प्रस्तावित करण्यात आले आहे. आयटी हब क्षेत्र निर्माणमध्ये जिल्हा परिषदेचे ही मोठे योगदान राहणार आहे. त्यामध्ये पायाभूत सुविधा म्हणजेच रस्ते, निवास व तेथील मूलभूत सुविधांबाबत जिल्हा परिषदेला यंत्रणा उभी करावी लागणार आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद  सोलापुरात आले होते. त्यांच्याकडून आयटी हब व आषाढी यात्रेबाबत मार्गदर्शन घेण्यात आल्याचे सीईओ जैन यांनी सांगितले. गतवर्षी आषाढी यात्रेसाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवत अनेक बाबींवर काम केले आहे. त्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले आहे. तसेच शासनाने प्रस्तावित केलेल्या आयटी पार्कबाबत अनेक प्रस्ताव जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी तयार केले आहे. त्याबाबत मार्गदर्शन करून काही सूचना त्यांनी दिल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात आयटी पार्कच्या पायाभूत सुविधांसाठी जिल्हा परिषदेलाही काम करावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पावसाळा तोंडावर पण पाणीटंचाई वाढली

पावसाळा तोंडावर असतानाच कडक उन्हामुळे आणि भूजल पातळीत घट झाल्यामुळे पाणीटंचाईची परिस्थिती कायम असून सध्या 16 गावे व 82 वाड्यांमधील सुमारे 30 हजार 155 नागरिकांना 17 टँकरच्या माध्यमातून पिण्याचे पाणीपुरवठा केला जात आहे. जर पावसाळा लांबला तर आगामी काळात टंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने 10 गावांसाठी आणखी 10 टँकर सुरू करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.जिल्हा प्रशासनाच्या 10 जून रोजीच्या अहवालानुसार सर्वाधिक टंचाईग्रस्त स्थिती माळशिरस तालुक्यात असून येथे 8 गावे आणि 63 वाड्यांतील 13 हजार 315 लोकसंख्येसाठी 8 टँकर कार्यरत आहेत. या तालुक्यात दररोज सर्वाधिक पाणीफेऱ्या होत आहेत.अक्कलकोट तालुक्यातील एका गावासाठी एक टँकर, बार्शी तालुक्यातील एका गावासाठी एक टँकर, दक्षिण सोलापूर तालुक्यातील एका गावासाठी एक टँकर तर सांगोला तालुक्यातील दोन गावे व 19 वाड्यांसाठी दोन टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्यातील एकूण टँकर व्यवस्थेद्वारे दररोज 35 पाणीफेऱ्या करण्यात येत आहेत.दरम्यान, पाणीटंचाईची व्याप्ती वाढू नये यासाठी प्रशासनाने अतिरिक्त टँकर मंजुरीचा प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर पाठविला आहे. प्रस्तावानुसार करमाळा तालुक्यातील चोटी व केम, माळशिरस तालुक्यातील कोयळे व उंबरे दहिगाव, माढा तालुक्यातील अंजनगाव व तुळशी, सांगोला तालुक्यातील कोळे तसेच मंगळवेढा तालुक्यातील लेंडवे चिंचाळे, खुपसंगी आणि रखे या गावांसाठी प्रत्येकी एक टँकर मंजूर करण्याची मागणी करण्यात आली आहे, असे सीईओ जैन यांनी यावेळी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button