सोलापूरजिल्हा परिषद

सोलापूर झेडपीचे उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी साधला परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद

सोलापूर : शिष्यवृत्तीचा टक्का वाढावा यासाठी जिल्हा परिषदेकडून आयोजित केलेल्या प्रज्ञाशोध परीक्षेला रविवारी आठ हजार विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शवली. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी परीक्षा केंद्रांना अचानक भेटी देऊन केंद्रावरील परिस्थितीचा आढावा घेतला.

दरवर्षी होत असलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा परिषदेमधील विद्यार्थ्यांचा टक्का वाढावा यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने इयत्ता तिसरी व सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पूर्वतयारी म्हणून जिल्ह्यातील 40 केंद्रावर प्रज्ञाशोध परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 11 ते दुपारी एक या वेळेत परीक्षा झाली. परीक्षा सुरू असल्याची माहिती मिळताच जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी बाळे येथील राजीव प्राथमिक शाळा येथील केंद्राला भेट देऊन परीक्षेचा आढावा घेतला. यावेळी शिक्षणाधिकारी कादर शेख, उपगटशिक्षणाधिकारी अविचल महाडिक, विस्तार अधिकारी सुदर्शन राठोड, केंद्रप्रमुख जीवराज खोबरे, मुख्याध्यापक मोहन घोडके, विश्वकृपा विद्या प्रतिष्ठानचे अमोल ढेपे आदी उपस्थित होते.
उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गौरव करणार
प्रज्ञाशोध व शिष्यवृत्ती परीक्षेत चांगल्या मार्काने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र व भेटवस्ते देऊन जिल्हा परिषदेच्या वतीने गौरव करण्यात येणार असल्याचे इंद्रजीत पवार यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांशी साधला संवाद..
इंद्रजीत पवार यांनी परीक्षा केंद्रांना भेटी दिल्यानंतर विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. परीक्षा लिहित असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांजवळ जाऊन, डेस्कवर बसून त्यांनी आपुलकीने विचारपूस केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button