सोलापूरआरोग्यजिल्हा परिषद

आषाढी यात्रेच्या औषध खरेदीसाठी निवडणूक आयोगाची परवानगी घेणार

सोलापूर : जिल्हा प्रशासनाकडून आषाढी यात्रेची तयारी सुरू झाली आहे. महाराष्ट्रात सध्या विधान परिषद निवडणुकीचे आचारसंहिता लागू असून आषाढी यात्रेत वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी औषधाची गरज भासत असल्यामुळे वेळीच खरेदी होण्यासाठी निवडणूक आयोगाची परवानगी मागण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार यांनी दिली.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे आषाढी यात्रेच्या तयारीसाठी यंत्रणा कामाला लागली आहे. गत्तवर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हास्तरीय यंत्रणा राबवून आषाढी यात्रा यशस्वी केली होती. आषाढी यात्रेत सहभागी होणाऱ्या मानांच्या पालख्याबरोबरचे वारकरी यांची चांगली आरोग्य व्यवस्था होण्यासाठी राज्याची आरोग्य यंत्रणा कामाला लागते. त्यात सोलापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचा मोठा रोल आहे. वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी स्वच्छतागृह, निवारा व्यवस्था आणि आरोग्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध केला जात आहे असे सभापती चेतनसिंह केदार यांनी सांगितले. यंदाही आषाढी यात्रा यशस्वी करण्यासाठी मोबाईल टॉयलेटची व्यवस्था वाढविण्यात आली आहे. त्याचबरोबर पालख्यांबरोबर चालत येणाऱ्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी मसाजर उपयोगी पडत असल्याने यंदा मसाजरची यंत्रणा वाढविण्यात येणार आहे. त्याचबरोबर वारकऱ्यांना औषधोपचाराची गरज भासते. पालखी मार्गावर कॉर्डियाक ॲम्बुलन्सबरोबरच इतर सर्व आरोग्य यंत्रणा उपलब्ध केली जाणार आहे. यासाठी गरजेच्या असणाऱ्या औषधाच्या खरेदीसाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे टेंडर काढण्यात आले आहेत. वास्तविक अत्यावश्यक सेवेतील खरेदीला कोणतीच अडचण येत नसते. पण सध्या विधान परिषदेची निवडणूक आचारसंहिता असल्याने औषध खरेदीला निवडणूक आयोगाच्या परवानगीसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्यामार्फत प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे सभापती केदार यांनी सांगितले.

गोंधळाची चौकशी होणार…

औषध खरेदीच्या प्रस्तावाबाबत विलंब झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. याबाबत कोणाची चूक झाली याची चौकशी केली जाणार आहे. आरोग्य विभागाचा कारभार सुधारण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. आवश्यकते तेथे अनुभवी कर्मचारी व अधिकारी नेमून आषाढी यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यासाठी लवकरच आरोग्य विभागाच्या तयारीचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासमवेत पालखी मार्गावर दौरा करून तेथील आरोग्य केंद्रातील सोयी सुविधांचा आढावा घेतला जाणार असल्याचे सभापती केदार यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button