सोलापूरजिल्हा परिषदशिक्षणसामाजिक

गुड न्यूज: दारू सोडली, संसार सुधारला, मुलगा पोलीस झाला अन् बीडीओनी सत्कार केला

सोलापूर: दारू सोडा, पाल्याला शिष्यवृत्ती मिळवा असा उपक्रम दक्षिण सोलापूरचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी करमाळ्यात असताना राबविला होता. यात तालुक्यातील 16 जणांनी शपथ घेत दारू सोडली अन त्यांचा संसार सुखाचा झाला. सुट्टीत करमाळ्याला गेल्यावर हरिनाम सप्ताहात त्यातील उमराव अंबारे यांची भेट झाली आणि त्यांनी साहेबांना हात जोडत, साहेब माझा मुलगा पोलीस झाला बर का..! असा आनंद व्यक्त केला.

गटविकास अधिकारी मनोज राऊत हे करमाळ्याला असताना दारू सोडवा, पाल्याला शिष्यवृत्ती मिळवा, असा उपक्रम यशकल्याणी सेवाभावी संस्था, ग्रामसुधार समिती, जीवन शिक्षण परिवार आणि पंचायत समिती करमाळा यांच्यावतीने राबवला होता. यात स्वातंत्र्यदिनापासून सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. यात करमाळा तालुक्यातील सोळा पालकांनी दारू सोडण्याची शपथ घेत या उपक्रमात सहभाग नोंदविला. गटविकास अधिकारी मनोज राऊत यांच्या संकल्पनेतून दारूमुक्तीसाठी हा अभिनव उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात आले होते. याला विविध संस्थांकडूनही प्रतिसाद मिळाला. या उपक्रमात सहभाग नोंदविणाऱ्या पालकांना  पंधरा ऑगस्टपला दारू सोडण्याची शपथ देण्यात आली. या उपक्रमात गौंडरेतील ५, फिसरे: ३, भगतवाडी गुलमोहोरवाडी आणि कविटगाव प्रत्येकी २, पाथुर्डी, भोसे, सरपडोह आणि खडकीमधील प्रत्येकी १ अशा सोळा जणांनी सहभाग घेतला. गटविकास अधिकारी मनोज राऊत, अॅड. बाबूराव हिरडे, यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे-पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्तीची मदत केली.

मार्चअखेरनंतर सलग सुट्ट्या असल्यामुळे गटविकास अधिकारी मनोज राऊत गावी गेले. त्यावेळी गौंडरे गावात सुरू असलेल्या हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमाला त्यांना निमंत्रित करण्यात आले. या कार्यक्रमात जेष्ठ नागरीकांची वसुंधरा परिवाराच्यावतीने एकाचवेळी पंच्चाहत्तरी साजरी केली. करमाळा पंचायतीचे गटविकास अधिकारी असताना दारू सोडवा शिष्यवृत्ती मिळवा हा उपक्रम राबविण्यात आलेला होता. यामध्ये उमराव अंबारे यांनी शपथ घेऊन दारू सोडली होती. त्यांची या कार्यक्रमात भेट झाली. सलग 4 वर्षे झाले त्यांनी दारूला हात लावला नाही. ते शेती करतात, दोन मुलं, दारूच्या व्यसनामुळे संसाराचा गाडा पत्नी कशातरी ओढत होत्या. अशात BDO राऊत यांच्या उपक्रमामुळे त्यांच्या संसाराला वेगळी दिशा मिळाली. दारू सोडल्यामुळे त्यांच्या संसारात बदल झाला.  विशेष म्हणजे त्यांचा मुलगा सयाजी आता पिंपरी चिंचवड पोलिसात भरती झाला आहे. हे सांगत असतानाच त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. मुलगा पोलीस झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील आयुष्यासाठी पुष्पगुच्छ देऊन सन्मान करत शुभेच्छा दिल्या. गौडरे गावात असा बदल घडविण्यासाठी एक देवदूत म्हणून BDO राऊत यांना आपल्या तालुक्यातच काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल भास्कर अंबारे यांनी समाधान व्यक्त केले. एक छोटासा प्रयोग एखाद्या कुटुंबात मोठा बदल घडवू शकतो. त्यामुळे असे प्रयोग होत राहिले पाहिजेत अशी प्रतिक्रिया BDO राऊत यांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button