सोलापूरजिल्हा परिषदशिक्षण

सोलापूर झेडपी शिक्षकांचा होणार गौरव; पुरस्कार देण्याची तयारी

सोलापूर: जिल्हा परिषद अध्यक्ष तसेच सर्व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील विकासकामांना अधिक गती देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. घरकुल योजनेला गती व शिक्षकांचे पुरस्कार मार्गी लावले जातील, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी पत्रकारांशी संवाद साधत जिल्हा परिषदेच्या विविध विभागांच्या कामकाजाची माहिती दिली. पत्रकारांनी शिक्षण, आरोग्य, घरकुल तसेच अन्य महत्त्वाच्या विषयांवर विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी सविस्तर उत्तरे दिली.

शिक्षण क्षेत्रातील गुणवत्तावाढीसाठी जिल्ह्यात पाच आदर्श शाळा विकसित करण्याचे नियोजन असल्याचे जैन यांनी सांगितले. यामध्ये तीन नियमित जिल्हा परिषद शाळा, एक पीएम श्री शाळा आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा एक अशा पाच शाळा विकसित करण्याचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा परिषद अध्यक्ष व सर्व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रशासनाच्या समन्वयातून हा उपक्रम पुढे नेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आरोग्य विभागाच्या कामगिरीचा आढावा देताना मुख्य कार्यकारी अधिकारी जैन यांनी सांगितले की, जिल्ह्यातील ३५ आरोग्य केंद्रांना आतापर्यंत NQAS प्रमाणपत्र प्राप्त झाले*आहे. आता ही संख्या १०० पर्यंत* *नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, ग्रामीण भागातील* *नागरिकांना अधिक दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे.

आरोग्य विभागाच्या कामकाजाबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना जैन यांनी सविस्तर माहिती देत विभागाच्या आगामी नियोजनाची माहिती दिली.

शिक्षण विभागासाठी महत्त्वाची माहिती देताना जैन यांनी सांगितले की, जिल्ह्यात नव्याने ३५५ शिक्षक रुजू होणार आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांची उपलब्धता वाढून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला आणखी चालना मिळणार आहे.

शाळांमध्ये वितरित करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या गणवेशाबाबतही पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला. यावर मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी गणवेशाचा दर्जा आणि प्रत्यक्ष वितरण याबाबत शिक्षण विभागाला सूचना देण्यात आल्याचे सांगितले.
यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी विशाल मुळे उपस्थित होते. शिक्षण विभागाशी संबंधित पत्रकारांच्या विविध प्रश्नांना विशाल मुळे यांनी सविस्तर उत्तरे देत विभागाच्या कामकाजाची माहिती दिली. शिक्षकांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेण्यासाठी जिल्हास्तरावर तसेच तालुकास्तरावर शिक्षक पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहितीही मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी दिली. ग्रामीण भागात शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पत्रकार परिषदेत ग्रामीण भागातील घरकुल योजनांच्या प्रगतीचाही आढावा घेण्यात आला. पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ वेळेत मिळावा आणि प्रलंबित कामांना गती मिळावी, यासाठी प्रशासनाकडून आवश्यक पाठपुरावा केला जात असल्याचे जैन यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button