सोलापूरजिल्हा परिषद

गतवर्षीचे व्हिडिओ, पीपीटी पाहून जिल्हा परिषदेचे सीईओ कुशल जैन यांची आषाढी वारीची तयारी

सोलापूर : गतवर्षी लक्षवेधी ठरलेल्या आषाढी वारीचे व्हिडिओ व जिल्हा परिषदेने तयार केलेल्या पीपीटीचा अभ्यास करून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी आषाढी वारी यशस्वी करण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. पालखी मार्गावरील स्वच्छता गृह व चालून दमलेल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी उपयुक्त ठरणाऱ्या मसाज सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आल्याची माहिती सीईओ कुशल जैन यांनी दिली.

जिल्हा प्रशासनातर्फे आषाढी वारीची जोरदार तयारी सुरू आहे. जिल्हाधिकारी एस कार्तिकेन यांनी सर्व यंत्रणांशी समन्वय साधून आषाढी वारीची जोरदार तयारी सुरू केली आहे. आषाढी वारीत सहभागी होण्यासाठी विविध पालकां द्वारे पायी चालत पंढरीकडे निघालेल्या भाविकांची व्यवस्था करण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेवर मोठ्या प्रमाणावर आहे. सीईओ कुशल जैन यांच्याकडे पहिल्यांदाच इतक्या मोठ्या यात्रेचे नियोजन करण्याची जबाबदारी आली आहे. त्यामुळे त्यांनी हा विषय गांभीर्याने घेऊन प्रत्यक्ष पालखी मार्गाची पाहणी करून तयारीला सुरुवात केली आहे. जिल्ह्यात येणाऱ्या मानांच्या दोन पालख्यांबरोबरच इतर अनेक पालख्या पंढरपूरकडे येत असतात. पालखी मार्गावरील सुविधेबाबत कोणतीच उणीव राहू नये यासाठी सीईओ कुशल जैन यांनी खबरदारी घेतली आहे. गतवर्षी सीईओ कुलदीप जंगम यांनी आषाढी वारीचे नियोजन केले होते. या नियोजनाचा अभ्यास करून या वारीत कोण कोणत्या त्रुटी आढळल्या याचा सीईओ जैन यांनी अभ्यास केला आहे. पालखी सोहळ्यांबरोबर स्वच्छतागृहे पुढे सरकवण्याची मोठी यंत्रणा लागते. पालखी सोहळ्यांसोबतची गर्दी व पाऊस आल्यास ही यंत्रणा हलवणे अवघड होते. गतवर्षी सातारा जिल्ह्यात ही समस्या निर्माण झाली होती. सोलापूरच्या टीमने तेथे जाऊन ही समस्या सोडवली. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात ही समस्या उद्भवू नये यासाठी आधीच नियोजन करण्याचे सीईओ जैन यांनी ठरविले आहे. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याचे टँकरचे नियोजन पंढरपूर समीप आल्यानंतर गर्दी वाढल्याने ढासळते. यासाठी पर्यायी यंत्रणा उभे करण्याची तयारी सीईओ जैन यांनी केली आहे.

स्वच्छतागृहे, मसाज सेंटर वाढवले

पालखी सोहळ्याबरोबर अडचण होती ती स्वच्छतागृहाची. त्यामुळे वेळेत हे स्वच्छतागृह पुढील मुक्कामी हलवणे व मुक्कामी असताना त्यांचा पुरेपूर उपयोग होण्यासाठी यंदा स्वच्छतागृहाची संख्या वाढविणचे सीईओ जैन यांनी सांगितले. करमाळ्याचे तत्कालीन बीडीओ मनोज राऊत यांनी पहिल्यांदा पालखी सोहळ्यांबरोबर पायी चालत येणाऱ्या भाविकांसाठी मसाज सेंटरचा प्रयोग केला होता. त्याचा चांगला फायदा झाल्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने हा प्रयोग मोठ्या प्रमाणावर राबवला. गतवर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उपक्रमाचे कौतुक करत राज्यस्तरावरून या उपक्रमाची दखल घेतली. त्यामुळे पालखी सोहळ्या बरोबर मसाज सेंटरची संख्या वाढविण्यात आली आहे, असे सीईओ जैन यांनी सांगितले. वारकऱ्यांना निवारा, पाणी, स्वच्छतागृह, औषधोपचार ही यंत्रणा पुरवली जाते. यासाठी ग्रामपंचायत व आरोग्य विभागाचे मोठे नियोजन असते.

आषाढी वारीच्या तयारीसाठी सीईओ जैन यांनी गतवर्षीची पीपीटी, वारीतील व्यवस्थेचे व्हिडिओ व संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन यंदा एक वेगळे नियोजन केले आहे. या नियोजनासाठी दोन मंत्र्यांबरोबर बैठक व विभागीय आयुक्तांसमोर सादरीकरण झाले आहे. त्यामुळे वारी काळात कोठे काय लागणार? या यंत्रणाची माहिती तोंडपाठ झाल्याचे त्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button