सोलापूरजिल्हा परिषदशिक्षण

झेडपी शिक्षणाधिकाऱ्याच्या आदेशाला केराची टोपली

प्रभारी केंद्रप्रमुख घाबरतात तरी कोणाला?

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी मुख्याध्यापकांना केंद्रप्रमुखपदी पदोन्नती दिल्यावर प्रभारी असणाऱ्या मुख्याध्यापकांना नवीन केंद्रप्रमुखाकडे पदभार देण्याचे आदेश प्रभारी प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रसाद मिरकले यांनी दिले असतानाही अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्यातील केंद्रप्रमुखांनी या आदेशाला ठेंगा दाखवला आहे.

निवृत्तीपर्यंत प्रभारी केंद्रप्रमुख पदावर राहण्याचे अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्यातील प्रभारी केंद्रप्रमुखांनी हट्ट धरला आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील  केंद्रप्रमुखांची बरीच पदे रिक्त होती. त्यामुळे प्रत्येक तालुक्यातील मुख्याध्यापकांना केंद्रप्रमुखांचा अतिरिक्त पदभार देण्यात आला होता. शिक्षकांमधून पदोन्नतीने केंद्रप्रमुखाची पदे भरावीत अशी प्राथमिक शिक्षक संघटनांनी मागणी लावून धरली होती. याची दखल मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी घेतली. सेवा जेष्ठता यादी तयार करून 60 शिक्षकांना नोव्हेंबरमध्ये केंद्रप्रमुख पदावर पदोन्नती देण्यात आली. समायोजनाद्वारे या नवीन केंद्रप्रमुखांना नियुक्त्या देण्यात आल्या. पण ह्या नियुक्त्या देताना शिक्षक संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी आपला पदभार जाऊ नये याची काळजी घेतल्याचे दिसून आले होते. याबाबत ‘सोलापूर समाचार” ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर सीईओ आव्हाळे यांनी याची दखल घेतली. त्यामुळे अशा मुख्याध्यापकांकडे असलेला पदभार नव्याने केंद्रप्रमुख झालेल्यांना देण्यात यावा अशी सूचना करण्यात आली. त्याप्रमाणे प्राथमिक शिक्षणाधिकारी मिरकले यांनी पाच डिसेंबर रोजी आदेश जारी केले होते. मुख्याध्यापकांकडे असलेला केंद्रप्रमुखांचा अतिरिक्त पदभार तात्काळ नव्याने पदोन्नती झालेल्यांना द्यावा असे आदेश देण्यात आले असताना अक्कलकोट व दक्षिण तालुक्यातील मुख्याध्यापकांनी मात्र पदभार सोडण्यास नकार दिला होता. अक्कलकोट तालुक्यातील शिक्षकांचा शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशालाच कोलदांडा लावल्याचे वृत्त ‘सोलापूर समाचार” ने प्रसिद्ध केल्यावर गटशिक्षणाधिकारी परमेश्वर आरबळे यांनी अखेर 18 डिसेंबर रोजी त्या 10 मुख्याध्यापकांना तात्काळ पदभार सोडण्याचे परिपत्रक जारी केले आहे. पण अद्याप यातील काही जणांनी पदभार सोडला नसल्याची तक्रार शिक्षकांनी केली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यात तर या आदेशाची अंमलबजावणी झाली नसल्याची तक्रार आहे. शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशालाच केराची टोपली दाखवली जाते, हा कसला कारभार म्हणावा अशी प्रतिक्रिया शिक्षकातून उमटत आहे.

प्रशिक्षणाचा बट्ट्याबोळ…

सध्या जिल्हाभर प्राथमिक शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. प्रशिक्षणावर मोठा खर्च केला जात आहे. पण प्रशिक्षणाची व्यवस्था तिसऱ्या मजल्यावर केली गेली आहे.  तिसऱ्या मजल्यावर दिव्यांग शिक्षकांनी कसे जायचे? अशी तक्रार केल्यावर त्यांना सूट देण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button