February 4, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

मंद्रूप परिसरातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप परिसरातील नागरिकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. जिल्हा शल्य चिकत्सक कार्यालयाने सार्वजनिक आरोग्य विभागाकडे मंद्रूप येथे प्रमुख केअर युनिट उभा करण्यासाठी नऊ कोटी 37 लाख रुपये खर्चाचा इमारत बांधणीचा प्रस्ताव सादर केला आहे.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने यांनी याबाबत अधिक माहिती दिली. मंद्रूप येथे ग्रामीण रुग्णालय झाले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्य सेवेत वाढ झाली आहे. मंद्रूप शेजारी विजयपूर हायवे व तसेच मंद्रूप मोहोळ बायपास आणि शेजारील गावाला जोडणारे मोठे राज्य मार्ग आहेत. या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण जास्त असल्यामुळे तसेच सीना व भीमा नदी खोऱ्याचा भाग येत असल्याने सर्पदंश, इलेक्ट्रिक विजेचे अपघाताचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे आपत्कलीन परिस्थितीत रुग्णांना चांगली सेवा मिळावी म्हणून मंद्रूप ग्रामीण रुग्णालयात रामा केअर युनिट सुरू करावे अशी मागणी होती. जागेवर अभावी हे काम गेल्या पाच वर्षापासून रखडले होते. मंद्रूप ग्रामीण रुग्णालय ज्या जागेत झाले आहे त्याच्या बाजूलाच प्राथमिक आरोग्य केंद्राची मोठी जागा व इमारती आहेत. यामध्ये पूर्वीच्या मंद्रूप प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत त्यामध्ये ओपीडी मेडिकल स्टोअर ऑपरेशन थेटर कुटुंब नियोजन ऑपरेशन थेटर व रुग्णांची ऍडमिटची इमारत आहे. या इमारतींना 40 वर्षापासून अधिक काळ झाल्यामुळे या इमारती पाडून या ठिकाणी ट्रॉमा केअर युनिट उभारावे असा प्रस्ताव तयार करण्यात आला. या प्रस्तावाला जिल्हा परिषद आरोग्य विभागाने मंजुरी दिली आहे. तसेच इमारती पाडण्यालाही मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे या जागेत वीस बेडचे प्रशस्त ट्रॉमा केअर युनिट उभारण्याचे नियोजन जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातर्फे करण्यात आले आहे. यासाठी 9 कोटी 37 लाखाच्या खर्चाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. ट्रॉमा केअर युनिटचा आराखडा व निधी मंजुरीसाठी प्रस्ताव पुणे मंडळ आरोग्य उपसंचालकाकडे सादर केला होता. पुणे मंडळाचे उपसंचालक डॉक्टर प्रशांत वाडीकर यांनी हा प्रस्ताव प्रशासकीय मान्यता व निधी उपलब्धतेसाठी मुंबई आरोग्य सेवेचे सहसंचालकांकडे सादर केला आहे त्यामुळे इमारतीचे बांधकाम अंदाजपत्रक व प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर ट्रॉमा केअर युनिटच्या कामाला वेग येणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माने यांनी सांगितले.