February 21, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

शाळेच्या बांधकाम पाडकामाचे अधिकार झेडपीकडे देण्याची मुख्यमंत्र्याकडे मागणी

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या शाळांच्या जीर्ण झालेल्या धोकादायक इमारतीचे पाडकाम करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याला अधिकार देण्यात यावेत, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवारी सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांची भेट झाल्यावर जिल्ह्यात जिल्हा परिषदेमार्फत सुरू असलेल्या विकास कामाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती घेतली. राज्यभर सध्या पावसाची संततधार सुरू आहे. पावसामुळे जुन्या जीर्ण व धोकादायक झालेल्या वर्ग खोल्यांमुळे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना धोका पोहोचू शकतो. जिल्ह्यात झेडपी शाळेच्या 133 वर्ग खोल्या धोकादायक झाल्या आहेत. जिल्हा परिषदेने या धोकादायक वर्ग खोल्यांचे स्ट्रक्चर ऑडिट केले आहे. अशा धोकादायक वर्ग खोल्या पाडण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे गेल्या तीन वर्षांपूर्वीच प्रस्ताव दिला आहे. पण बांधकाम विभागाने या शाळांच्या वर्ग खोल्यांची तपासणी करून खोल्या पाडण्याबाबत अद्याप दाखला दिलेला नाही. बांधकाम विभागाकडे असलेला कामाचा पसारा पाहता जिल्हा परिषदेकडून गेलेल्या अशा कामाबाबत दिरंगाई होत आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांच्या वर्ग खोल्यांच्या नवीन बांधकामासाठी डीपीसीतून आलेला निधीही परत जात आहे. त्यामुळे वेळेत काम होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तत्पर कार्यवाही होणे अपेक्षित आहे. पण गेल्या तीन वर्षापासून हा प्रस्ताव पडून असल्यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. जिल्हा परिषदेकडे स्वतःचा बांधकाम विभाग कार्यरत आहे. या विभागाकडे सार्वजनिक विभागाकडूनच अधिकारी नियुक्त होत असतात. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागालाच वर्ग खोल्या व इतर धोकादायक इमारतीची पाहणी करून पाडकामाचे अधिकार देणे गरजेचे आहे. यावर गांभीर्याने विचार करून असा धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती सीईओ कुलदीप जंगम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या विनंतीला मान देत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.

पापरी शाळेच्या बांधकामाची पाहणी

मोहोळ तालुक्यातील पापरी येथे 2 कोटी रूपये खर्चून सुरू असलेले 12 वर्ग खोल्याचे काम पुर्णत्वास जात आहे. समग्र शिक्षा अभियानातील सुरू असलेल्या या वर्ग खोल्याच्या कामांची पाहणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी केली. याप्रसंगी समग्र शिक्षा अभियानचे प्रभारी कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, मुख्याध्यापक आबा टेकाळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र शेळके, उपाध्यक्ष नितीन भोसले, शिक्षण प्रेमी पद्माकर भोसले, माजी सरपंच सौदागर खडके उपस्थित होते. मोहोळ तालुक्यातील पापरी येथे जिल्हा परिषदेच्या समग्र शिक्षा अभियानातून १२ शाळा खोल्याचे काम सुरू आहे. जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार घेतले नंतर सिईओ कुलदीप जंगम यांनी या शाळेच्या पायाची पाहणी केली होती. आज पुर्णत्वाकडे जात असलेले काम पाहून समाधान व्यक्त केले.