March 18, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

गाडीला कट मारल्याच्या वादातून मंद्रूपच्या तरुणाचा लातुरात खून

लातूर, विशेष प्रतिनिधी : लातूर शहरात रात्री उशिरा झालेल्या एका धक्कादायक घटनेत, भरधाव जाणाऱ्या क्रुझर गाडीने एर्टिगा गाडीला ओव्हरटेक केल्याच्या वादातून दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथील तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेत त्याच्यासोबत असलेली मैत्रिणही गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. ही घटना १७ आणि १८ सप्टेंबरच्या मध्यरात्री १.४० वाजण्याच्या सुमारास लातूर शहरातील पाच नंबर चौक ते औसा रोड बायपासवर घडली.

मयत अनमोल केवटे हा सोलापूर जिल्ह्यातील मंद्रूपचा रहिवासी असून, अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचा माजी जिल्हाध्यक्ष होता. अनमोल अनिल केवटे (रा. मंद्रुप, ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर) आणि सोनाली भोसले (रा. अंत्रोळी, ता. दक्षिण सोलापूर) हे एर्टिगा गाडीने जात असताना, मागून आलेल्या (क्र. एमएच २६/ व्ही २३५६) क्रुझर गाडीने त्यांना ओव्हरटेक करत कट मारला. यावरून दोन्ही गाडीतील चालकांमध्ये वाद सुरू झाला. वाद वाढत गेल्याने क्रुझर गाडीतील चार तरुणांनी एर्टिगा गाडीला थांबवले. त्यांनी अनमोल आणि सोनालीसोबत शिवीगाळ करत मारामारी केली. याचवेळी एका तरुणाने चाकू काढून अनमोलच्या छातीत भोसकून त्याचा जागीच खून केला. अनमोलला वाचवण्यासाठी पुढे आलेल्या सोनालीवरही आरोपींनी चाकूने वार केले, ज्यात ती गंभीर जखमी झाली. घटना घडल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला. शिवाजीनगर पोलिस ठाण्यात या घटनेचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस फरार आरोपींचा शोध घेत आहेत. या निर्दयी हल्ल्यामुळे लातूर शहरात एकच खळबळ उडाली आहे. जखमी सोनाली भोसले ही अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या युवती विभाग मुख्य कार्यकारी अध्यक्षा आहे, असे पोलिसांनी सांगितले.

लातूर शहरातील पीव्हीआर चौक ते छत्रपती चौकाकडे जाणा-या रिंग रोडवरील लहुजी साळवे चौकातून सोलापूरला जात असताना एम. एच. २६ व्ही- २३५६ या क्रमांकाच्या जीपमधुन  आलेल्या तरुणांनी त्यांच्यावर हल्ला केला. दरम्यान कारचालक नवनाथ धाकपाडे रा. सोलापूर याच्या फिर्यादीवरुन शिवाजीनगर पोलीस ठाण्यात खुन व खुनाचा प्रयत्न अशा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना झाली आहेत.