सोलापूरजिल्हा परिषदशिक्षण

सोलापूर झेडपी शिक्षणमध्ये उर्दू शिक्षक समायोजनात गोंधळ

सोलापूर: सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात अतिरिक्त झालेल्या उर्दू शिक्षक समायोजनात गोंधळ करण्यात आला आहे. हत्तुर जिल्हा परिषदेच्या शाळेवर करण्यात आलेल्या शिक्षकाची नियुक्ती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या नियुक्तीबाबत शिक्षण विभागाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची दिशाभूल केल्याचे समोर आले आहे.

राज्यातील शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या झाल्या. या बदल्यात उर्दू शिक्षकांना शाळा न मिळाल्यामुळे त्यांनी नकार दिला. यातून अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने नुकतेच समायोजन केले आहे. ऑनलाइन बदल्यात शाळा न मिळालेल्या दोन शिक्षकांचे समायोजन होऊ शकले नव्हते. त्यामुळे या शिक्षकांचा पगार निघत नव्हता. या शिक्षकांचे समायोजन करण्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्याकडे प्रस्ताव सादर केला. यामध्ये एका शिक्षिकेची औराद तर दुसऱ्या शिक्षकाची हत्तूर शाळेवर नियुक्ती करण्यात आली आहे. हत्तुर शाळेवर नियुक्त करण्यात आलेल्या अख्तर शेख यांची नियुक्ती आता वादात सापडली आहे.

अक्कलकोट तालुक्यातील विषय शिक्षक जहाआरा शेख यांनी या नियुक्तीला आक्षेप घेतला आहे. त्या जिल्हा परिषद कडबगाव शाळेमध्ये कार्यरत असून सन 2020– 25 च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त झाल्या आहेत. त्यांनी ऑनलाईन बदलीसाठी अर्ज केला होता. पण शाळा उपलब्ध झाली नव्हती. शाळा उपलब्ध न झालेल्या शिक्षकांचे समायोजन करण्यात आले. त्यात वरिष्ठ म्हणून शेख यांचा अव्वल क्रमांक होता. विषय शिक्षक वेतनश्रेणी व पती-पत्नी एकत्रित म्हणून जिल्हा परिषद औराद किंवा हत्तूर शाळेत त्यांनी नियुक्ती मिळण्यासाठी विनंती अर्ज 19 ऑगस्ट 2025 रोजी केला होता. 14 नोव्हेंबर रोजी प्राथमिक शिक्षण विभागाने उर्दू माध्यमाच्या अतिरिक्त विषय शिक्षकांचे समायोजन केले आहे. त्यात अख्तर गफूर शेख यांना मंद्रूप शाळेवरून हत्तूर शाळेच्या ठिकाणी समायोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे आख्तर शेख हे उपशिक्षक असून वेतनश्रेणीही घेत नाहीत. हत्तुर शाळेची जागा विषय शिक्षक, वेतन श्रेणीसाठी असताना केवळ पगार निघत नाही म्हणून उपशिक्षकाचे चुकीचे समायोजन करण्यात आले आहे. उपशिक्षकांसाठी इतर शाळांवर जागा असताना हा नवीन नियमबाह्य पायंडा पाडण्यात आला आहे. यामुळे शिक्षकांमध्ये असंतोष पसरला असून आता इतर शिक्षकांनाही हा नियम लागू करावा, अशी मागणी जोर धरत आहे.

सीईओंची केली दिशाभूल…

या प्रकरणात सीईओची दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप शिक्षकांनी केला आहे. या चुकीच्या समायोजनामुळे वेतनश्रेणी घेणाऱ्या शिक्षिकेला नियुक्तीपासून वंचित राहावे लागले आहे. त्या शिक्षकाचा पगार निघत नसल्यामुळे नियमानेच हे समायोजन केल्याचा दावा प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी केला आहे. पण शिक्षण विभाग चुकीची माहिती देत असल्याचा आरोप करीत शिक्षक संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे हा विषय आता चांगलाच ऐरणीवर आला आहे.

काय केली गडबड? 

हत्तुर जिल्हा परिषद उर्दू शाळेत विषय शिक्षकाची जागा आहे. नवीन संच मान्यतेत ही जागा उपलब्ध नाही. असे असताना प्राथमिक शिक्षण विभागाने उपशिक्षकाची टॅगचा आधार घेऊन व वेतनश्रेणी न देण्याच्या अटीवर नियुक्ती केली. त्या शिक्षकाची पत्नी महापालिकेत कामाला असताना पती-पत्नीचा आधार घेताना जिल्हा परिषदेत कार्यरत असलेल्याना प्राधान्य देणे गरजेचे आहे. जहाआरा यांचे पती जिल्हा परिषदेच्या शाळेतच कार्यरत आहेत. असे असताना आणि विशेष म्हणजे विषय शिक्षक उपलब्ध असताना अशी नियुक्ती करणे चुकीचे आहे. त्यामुळे विषय शिक्षकावर अन्याय झाला आहे. सीईओ कुलदीप जंगम यांनी ही बाब गांभीर्याने घेणे गरजेचे झाले आहे.

शिक्षकाची कोर्टात धाव…

करमाळा तालुक्यातील घोटी येथील एका शिक्षकाचे अशाच प्रकारे समायोजन करण्यात येत होते. पण त्या शिक्षकाने मी अतिरिक्त होऊ शकत नाही म्हणून न्यायालयात धाव घेतली आहे. उर्दू शिक्षकांचे समायोजन करताना उपशिक्षकांच्या ठिकाणीच त्यांची नियुक्ती केली असती तर असा प्रश्न आला नसता असा सूर शिक्षकांमधून निघत आहे. या प्रकरणाची चौकशी होऊन “त्या’ शिक्षिकेला न्याय द्यावा अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button