सोलापूर: सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धडाकेबाज कामगिरी केली आहे. दोन गावठी पिस्तूल विक्रीसाठी घेऊन आलेल्या तीन जणांना अटक करून आठ काडतूसे व मोटार सायकल असा २ लाख १६ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे अशी माहिती पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सोलापूर महानगर पालिका निवडणूक २०२५ चे अनुषंगाने सोलापूर शहरामध्ये अवैध शस्त्र/अग्नीशस्त्राचा वापर करून घडणाऱ्या गुन्ह्यांना प्रतिबंध करणेबाबत पोलीस आयुक्तांनी शहर गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना विशेष मोहिम घेवून कारवाई करणेसंदर्भात मार्गदर्शन करून सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने दिनांक ११ जानेवारी रोजी गुन्हे शाखेकडील पोलीस हवालदार संताजी रोकडे व पोलीस शिपाई भारत पाटील यांना गोपनिय बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की, ” डी. आर. एम. रेल्वे ऑफिसचे बाजुस असलेल्या रेल्वे कॉलनीचे वॉल कंपाऊंडलगत मोकळया जागेत तीन इसम हे त्यांचेकडील काळया रंगाचे युनिकॉर्न मोटारसायकलवर थांबले असुन त्यांचेकडे देशी बनावटीचे पिस्टल आहेत. प्राप्त बातमीबाबत शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांना सविस्तर माहिती देवून वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील स.पो.नि. दत्तात्रय काळे व त्यांचे तपास पथक असे प्राप्त माहितीचे आधारे त्या ठिकाणी गेले असता त्यांना तेथे एक काळया रंगाची युनीकॉर्न मोटारसायकलवर ३ इसम संशयास्पदस्थीतीत थांबल्याचे दिसून आले. स.पो.नि. दत्तात्रय काळे व त्यांचे तपास पथकाने या इसमांना शिताफिने जागीच ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या त्या तीन इसमांना त्यांचे नाव, पत्ता व इतर महिती विचारली असता त्यांनी त्यांची नावे महंमदरफिक लालसाब जातगर ऊर्फ मनगोळी (वय-२६ वर्ष, व्यवसाय मजुरी रा. जातगर वस्ती, हुलगन्मा मंदीर जवळ, अलमेल, ता. सिंदगी, जि. विजापूर, राज्य कर्नाटक), मोटारसायकलवर पाठीमागे बसलेला राजा नुरजानसाब सौदागर (वय-२६ वर्ष, व्यवसाय बेकार रा. वॉर्ड नंबर -०९, एकनंदी कॉलेज जवळ, भारत नगर, अलमेल, ता. सिंदगी) आणि मोटारसायकलजवळ उभा असलेल्या इसमाने प्रदीप सुर्यकांत काळभोर (वय-३५ वर्ष, व्यवसाय मेकॅनिक रा.लोणी स्टेशन जवळ, तुळजाभवानी मंदीर पुढे, इंदिरा नगर, कदम वस्ती, लोणी काळभोर, पुणे) अशी नावे सांगीतली. त्यानंतर पंचासमक्ष नमूद आरोपींची अंगझडती घेतली अस्ता राजा नुरजानसाब सौदागर याच्या कंबरेच्या डाव्या बाजूस पैंटमध्ये एक देशी बनावटीचे पिस्टल व खिशामध्ये ५ काडतुसे मिळुन आली. तसेच प्रदीप सुर्यकांत काळभोर याच्या कंबरेस डाव्या बाजूस पेंटमध्ये खोचलेले एक देशी बनावटीचे पिस्टल व खिशामध्ये ३ काडतुसे मिळुन आली. त्याअनुषंगाने मिळून आलेल्या अग्नीशस्त्राच्या परवान्याबाबत त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांचेकडे कोणताही शस्त्र परवाना नसल्याचे व दोन्ही पिस्टल, ८ काडतुसे विक्री करण्याचे उद्देशाने आल्याचे सांगितले. त्यानुसार तिघांविरूध्द सदर बझार पोलीस ठाण्यात गु.र.नं-२७/२०२६ भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५ अन्वये गुन्हा नोंद करणेत आला आहे.
अशा प्रकारे शहर गुन्हे शाखेकडील स.पो.नि. दत्तात्रय काळे व त्यांचे तपास पथकानी या तीन आरोपींकडून २ देशी बनावटी पिस्टल व ८ काडतुसे, मोटारसायकल असा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त एम. राजकुमार, उप आयुक्त डॉ. अश्वीनी पाटील, शहर गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त राजन माने,वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, यांचे मार्गदर्शनाखाली, स.पो.नि. दत्तात्रय काळे व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार संताजी रोकडे, अनिल जाधव, महेश शिंदे, भारत पाटील, कुमार शेळके, राजु मुदगल, महेश पाटील, महेश रोकडे, अंकुश भोसले, सुभाष गुंडे, सिध्दाराम देशमुख, राजेश मोरे, अजय गुंड, सायबर पो.स्टे. कडील प्रकाश गायकाड, मच्छिद्र राठोड, चालक, सतिश काटे, बाळु काळे यांनी केली आहे.

More Stories
रेड कार्पेट; सोलापूर झेडपी अध्यक्ष निवडीची जय्यत तयारी
सांगोल्यात दहावीच्या भूगोलच्या पेपरची चोरी; तरीपण ठरल्याप्रमाणे विद्यार्थ्यांची परीक्षा होणार
अखेर.. सोलापूर झेडपीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष ठरले