सोलापूर : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमुळे लागू असलेल्या आचारसंहितेमुळे ग्रामपंचायत व जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रजासत्ताक दिनी झेंडावंदन कोण करणार असा प्रश्न निर्माण झाला होता. पण जिल्हा परिषदेच्या विभाग प्रमुखाने परिपत्रक काढून स्पष्टीकरण दिल्यामुळे ग्रामसेवक व मुख्याध्यापक यांना झेंडावंदनाची संधी मिळाली आहे.
15 ऑगस्ट व प्रजासत्ताक दिनी ग्रामपंचायत व जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सरपंच व गावातील लोकप्रतिनिधींकडून झेंडावंदन करण्याची प्रथा आहे. सध्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्यामुळे बऱ्याच गावांमध्ये सरपंच व इतर लोकप्रतिनिधींकडून झेंडावंदन करणे अडचणीचे ठरणार होते. हे वाघ जिल्हा परिषदेच्या प्रशासनास निदर्शनास आणून दिल्यानंतर प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी याबाबत परिपत्रक काढण्याच्या विभाग प्रमुखांना सूचना दिल्या. त्यानुसार प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कोण झेंडावंदन करणार याबाबत परिपत्रक जारी केले आहे. जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांना यावेळेस प्रजासत्ताक दिनी झेंडावंदन करता येणार आहे. तसेच ग्रामपंचायत मध्ये संबंधित गावचे ग्रामविकास अधिकारी किंवा पदभार असेल तर शाळेच्या मुख्याध्यापक किंवा अंगणवाडी सेविकांना संधी द्यावी, असे सुचवण्यात आले आहे. यामुळे आचारसंहितेत झेंडावंदन कोणी करायचा याबाबतचा पेच सुटला आहे. प्रजासत्ताक दिनी झेंडावंदन करण्याचे संधी मिळत असल्याबाबत मुख्याध्यापक ही आनंदित झाले आहेत.


More Stories
रेड कार्पेट; सोलापूर झेडपी अध्यक्ष निवडीची जय्यत तयारी
सांगोल्यात दहावीच्या भूगोलच्या पेपरची चोरी; तरीपण ठरल्याप्रमाणे विद्यार्थ्यांची परीक्षा होणार
अखेर.. सोलापूर झेडपीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष ठरले