February 5, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजपची सत्ता; त्यामुळे झेडपीची चावी भाजपकडे द्या

सोलापूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजपाचे उमेदवार निवडून आल्यानंतर येत्या पाच वर्षांत घरकुलचा कायापालट करून या परिसराला  नंदनवन बनविणार असल्याचे अभिवचन आमदार देवेंद्र कोठे यांनी दिले.

भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा परिषद कुंभारी गटाच्या उमेदवार श्रुती भोरगोंडे, धोत्री पंचायत समिती गणाच्या उमेदवार शिल्पा बिराजदार आणि कुंभारी पंचायत समिती गणाचे उमेदवार सुरज पाटील यांच्या प्रचारार्थ विडी घरकुल येथे प्रचार सभा झाली. या सभेस विडी घरकुल परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उत्साहात जोरदार प्रतिसाद दिला. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा परिषद कुंभारी गटाच्या उमेदवार श्रुती भोरगोंडे, धोत्री पंचायत समिती गणाच्या उमेदवार शिल्पा बिराजदार आणि कुंभारी पंचायत समिती गणाचे उमेदवार सुरज पाटील, अण्णाप्पा बाराचारे, महेश बिराजदार आदी उपस्थित होते.

आमदार कोठे म्हणाले, दिल्लीपासून सोलापूर महानगरपालिकेपर्यंत भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीतदेखील भाजपची सत्ता आली तर सोलापूर शहर जिल्ह्याचा संपूर्ण विकास होण्यास गती मिळणार आहे. नरसय्या आडम यांनी रे नगरच्या भूमीपूजनप्रसंगी तसेच लाभार्थ्यांना घराच्या चाव देण्याच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले. परिसराचा विकास करायचा असेल तर भाजपाची सत्ता आणणे आवश्यक आहे, हे जनतेला कळले आहे. नरसय्या आडम आणि विरोधकांनी आजवर तब्बल २० वर्षे सत्ता असूनही विडी घरकुल आणि परिसरासाठी रस्ते, ड्रेनेज, वीज, पाणी अशी विकासकामे का केली नाहीत ? भाजपाची सत्ता आल्यानंतर या परिसरातील रस्त्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आगामी वर्षभरात या परिसरातील विकासासाठी पाच कोटी रुपयांचा निधी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून मिळवण्यात येईल, असे आश्वासनही आमदार देवेंद्र कोठे यांनी याप्रसंगी दिले.

विरोधकांचे काही समर्थक विडी घरकुल परिसरातील कष्टकरी तेलुगु बांधवांना त्रास देतात. या परिसरात मंदिर बांधायला विरोध करतात. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी २० लाखांचा निधी तत्काळ मंजूर करूनदेखील सोसायटीने ना हरकत प्रमाणपत्र न दिल्यामुळे विकासकामे थांबली आहेत. या परिसराचा संपूर्ण विकास होण्यासाठी येथील सोसायट्यांचे हस्तांतर सरकारकडे करण्याची गरज आहे. हे हस्तांतर झाल्यानंतर विडी घरकुलसाठी रस्ते, वीज, ड्रेनेज, पाणी यांसह सभामंडप, मंदिर अशी विविध प्रकारची अत्यावश्यक कामे सरकारच्या माध्यमातून करणे सोयीचे होणार आहे. सोलापूर महानगरपालिकेसाठी केंद्र सरकारने १०० ई बस मंजूर केले आहेत. यातील ३० बस मार्चपर्यंत उपलब्ध होणार आहेत. यातील काही बस घरकुल परिसरातील कामगार, माता भगिनींसाठी उपलब्ध करून देण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेणार आहे. मतदारांनी भाजपच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे, अशी साद आमदार देवेंद्र कोठे यांनी मतदारांना घातली.

कोणाच्याही दहशतीला घाबरू नका

मी येथील नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभा असून नागरिकांनी कोणाच्याही दहशतीला न घाबरता काम करावे. येथील कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीचा झेंडा बिंधास्तपणे लावावा, असे आवाहनही आमदार देवेंद्र कोठे यांनी याप्रसंगी केले.