August 11, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

आमदार कल्याणशेट्टी यांच्या चालकाला पैशांची ऑफर! गोळी घाल म्हणणाऱ्या दोघांपैकी फुलारीला अटक 

सोलापूर : अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना व त्यांची पत्नी, मुलाला गोळी घालून मारण्याची ऑफर त्यांच्याच चालकास देणाऱ्या दोघांवर सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. यातील प्रभाकर फुलारी (वय २३, रा. मल्लिकार्जुन नगर, सोलापूर) यास पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्याला बुधवारपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे..

शुक्रवारी ७ ऑगस्ट रोजी दुपारी पावणेचारच्या सुमारास आमदार कल्याणशेट्टी हे त्यांची पत्नी व मुलासह सोलापुरातील महावीर चौकातील प्युमा शोरूममध्ये खरेदीसाठी आले होते. त्यावेळी आमदारांचा चालक गाडीत बाहेरच थांबला होता. त्याठिकाणी श्रीशैल हुळ्ळी (रा. वडगाव, ता. दक्षिण सोलापूर) व प्रभाकर फुलारी हे दोघे आले. फुलारी हा हुळ्ळी याच्याकडे पाच-सहा महिन्यांपासून चालक म्हणून काम करीत आहे. यातील मुख्य संशयित श्रीशैल हुळ्ळी याने आमदार कल्याणशेट्टी यांचा चालक फिर्यादी आनंद स्वामीराव सुरवसे (रा. मोट्याळ, ता. अक्कलकोट) यास ‘तुला पैसे देतो तुझ्या दादा आमदाराला गोळी घालून मार, मी पुढचे बघतो’, अशी ऑफर दिली. त्यावेळी ‘तुला साहेब काय म्हणतात नीट ऐक, त्यात तुझा फायदा आहे’ असे फुलारी म्हणाला. त्यांनी पैशांचे आमिष दाखवून आमदार कल्याणशेट्टी यांना गोळ्या घालून जीवे ठार मारण्यासाठी ऑफर दिल्याची फिर्याद चालक आनंद सुरवसे यांनी पोलिसांत दिली. गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक राहुल सावंत करीत आहेत.

हुळ्ळी तडीपारीतील आरोपी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडगाव येथील श्रीशैल हुळ्ळी याची ‘वाळू माफीया’ अशी त्या भागात ओळख आहे. वळसंग पोलिसांत याच्याविरोधात सहा ते सात गुन्हे दाखल आहेत. तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक अनिल सनगल्ले यांच्या प्रस्तावानुसार पोलिस अधीक्षकांनी हुळ्ळीवर तडीपारीची कारवाई केली होती. त्याने तडीपारीचा आदेश मोडल्याने दोनवेळा पुन्हा वळसंग पोलिसांत गुन्हे दाखल झाले. तो अद्याप तडीपारीचा आदेश भंग करूनच फिरत असल्याचेही पोलिसांनी सांगितले. आता त्याने आमदार कल्याणशेट्टी यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

आमदार कल्याणशेट्टी यांना जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या श्रीशैल हुळ्ळी याच्याकडे विनापरवाना बंदुक असावी, असा पोलिसांना संशय आहे. त्याने विद्यमान आमदाराला अशी धमकी कोणाच्या सांगण्यावरून आणि का धमकी दिली, या प्रश्नांची उत्तरे अद्याप गुलदस्त्यातच आहेत. अटकेतील फुलारी अजूनही पोलिसांना काही सांगत नाही. त्यामुळे पोलिस आता मुख्य संशयित हुळ्ळी याचा शोध घेत आहेत. त्यासाठी सदर बझार पोलिसांची दोन आणि शहर गुन्हे शाखेची पथके रवाना झाली आहेत.

फुलारीला बसचा पाठलाग करून पकडले

आमदार कल्याणशेट्टी यांना जीवे मारण्याची धमकी देऊन दोन्ही संशयित आरोपी दोन वेगवेगळ्या वाहनांमधून पुण्याच्या दिशेने पसार झाले. गोपनीय बातमीदार व मोबाईल लोकेशनवरून पोलिसांनी प्रभाकर फुलारी याचा ठिकाणा शोधला. तो पुण्यावरून एसटी बसमधून पुण्याच्या दिशेने येत होता. इंदापूर टोलनाका ओलांडून बस सोलापूरच्या दिशेने येत होती. सदर बझार पोलिसांच्या पथकाने त्या गाडीचा अंदाज घेऊन बस थांबवली. साध्या पोशाखातील पोलिस बसमध्ये चढले आणि त्यांच्याकडील फोटोवरून त्यांनी रविवार ९ ऑगस्टच्या मध्यरात्री दीडच्या सुमारास फुलारीला पकडून सोलापुरात आणले.