August 11, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

शाळेच्या वेळेत झेडपी शिक्षकांना शाळेतच राहावे लागणार

सोलापूर  : जिल्हा परिषद सोलापूरच्या शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण विभागाची महत्त्वपूर्ण आढावा बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. बैठकीस प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्यासह विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख आणि शिक्षण विभागातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजना, विद्यार्थी पटनोंदणी, शाळांची सद्यस्थिती, मोफत गणवेश वितरण, शाळा दुरुस्ती व बांधकामे, शिक्षक समायोजन, प्रलंबित न्यायालयीन प्रकरणे, शाळांमधील मूलभूत सुविधा तसेच विविध शैक्षणिक योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

यावेळी सभापती चेतनसिंह केदार यांनी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, प्रत्येक योजना वेळेत व प्रभावीपणे राबवावी, शाळांमधील प्रलंबित कामांना गती द्यावी तसेच शिक्षण विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम करून शिक्षणाची गुणवत्ता अधिक उंचावण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना दिल्या.

बैठकीत जिल्ह्यातील शाळांच्या प्रगतीचा आढावा घेताना विद्यार्थीहिताला सर्वोच्च प्राधान्य देत शासनाच्या सर्व योजना प्रभावीपणे राबविण्यावर भर देण्यात आला. तसेच शैक्षणिक गुणवत्तेसोबतच शाळांमधील मूलभूत सुविधा, विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि प्रशासकीय कामकाज अधिक सक्षम करण्याबाबतही चर्चा करण्यात आली.

सर्व शिक्षा अभियानांतर्गत शाळानिहाय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येते. या तपासणीदरम्यान हृदयविकाराची समस्या आढळलेल्या ३९ विद्यार्थ्यांची हृदय शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली असून, त्यापैकी २८ विद्यार्थी मुंबई येथे उपचारासाठी जाण्यास तयार झाले आहेत. उर्वरित विद्यार्थ्यांचेही केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी पालकांसह समुपदेशन करून त्यांना उपचारासाठी तयार करावे, अशा स्पष्ट सूचना सभापती चेतनसिंह केदार यांनी दिल्या.

या विद्यार्थ्यांना मुंबई येथे पाठवून त्यांच्या हृदय शस्त्रक्रियेची प्रक्रिया पूर्ण करून घेण्यासाठी शिक्षण विभागाने आवश्यक समन्वय साधावा, तसेच कोणताही विद्यार्थी उपचारापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित बाबींना प्राधान्य देण्यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला. जिल्हा स्तरावरील विद्यार्थी सुरक्षा व आरोग्य विषयक आढाव्याचाही शिक्षण विभागाच्या सादरीकरणात समावेश आहे.

शाळाबाह्य बालकांसाठी विशेष मोहीम

दरम्यान, शाळाबाह्य बालकांचे सर्वेक्षण करून त्यांना पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश सभापती केदार यांनी दिले. यासाठी सर्व संबंधितांनी समन्वयाने काम करून सर्वेक्षणासाठी एक दिवस निश्चित करावा आणि एकही पात्र बालक शिक्षणापासून वंचित राहणार नाही, यासाठी प्रभावी कार्यवाही करावी, असे त्यांनी सांगितले.

शिक्षकांनी शाळेतच उपस्थित राहावे

शाळेच्या वेळेत शिक्षकांनी कोणत्याही कारणासाठी विनाकारण शाळेबाहेर जाऊ नये. विद्यार्थ्यांच्या अध्यापनाचा वेळ प्रभावीपणे वापरला जावा आणि शिक्षकांची शाळेतील उपस्थिती सुनिश्चित व्हावी, याबाबतही सभापती केदार यांनी स्पष्ट निर्देश दिले.

विद्यार्थ्यांचे आरोग्य, शिक्षण आणि सुरक्षितता या तीनही बाबींना केंद्रस्थानी ठेवून बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय व सूचना देण्यात आल्या. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच त्यांच्या आरोग्याचीही काळजी घेऊन ‘विद्यार्थीहित प्रथम’ या भूमिकेतून शिक्षण विभागाने काम करावे, सदर बैठकीसाठी सर्व गटशिक्षणाधिकारी विस्तार अधिकारी सर्व कर्मचारी उपस्थित होते