August 12, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

टीईटी पेपरफुटी प्रकरणात सोलापूरच्या प्रकाश पवारला अटक

सोलापूर : शिक्षक पात्रता परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात एसआयटीने सोलापुरातील रुक्माई पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राचा चालक प्रकाश धनसिंग पवार (रा. कुमठे) याला अटक केली आहे.

एसआयटीने अटक केलेल्या प्रकाश पवार हा सोलापुरातील कुमठे परिसरात ध्रुव प्रतिष्ठान संचलित रुक्माई पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र चालवत होता. सन 2012 ते 2020 या काळात त्याने एक हजाराहून अधिक गोरगरीब विद्यार्थ्यांना या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून मोफत पोलीस भरतीपूर्व व स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण दिले. कोरोना काळात त्याचे डोळे गेल्यामुळे हे प्रशिक्षण थांबले होते. या केंद्रात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना तो निशुल्क प्रशिक्षण देत होता. यातील प्रशिक्षणार्थी पोलीस भरती झाल्यानंतर स्वखुशीने शुल्क देत होते, असे तो सांगत होता. कोरोना महामारीनंतर तो आता काही दिवसात हे केंद्र पुन्हा सुरू करणार होता. पण मंगळवार दि. 11 ऑगस्ट रोजी टीईटी पेपरफुटी प्रकरणात शासनाने नेमलेल्या एसआयटीने सोलापुरात येऊन प्रकाश पवार याला अटक केली. त्याला भिवंडी न्यायालयासमोर हजर केले असता 15 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

टीईटी पेपरफुटी प्रकरणात एसआयटीने आत्तापर्यंत 15 संशयीतांना अटक केली आहे. त्यात सोलापूरच्या प्रकाश पवार याचाही समावेश झाल्यामुळे चर्चेचा विषय झाला आहे. एसआयटीच्या पथकाने प्रकाश पवार याच्या घराची व पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या कार्यालयाची तपासणी केल्यावर त्याच्याकडे विविध स्पर्धा परीक्षांचे 26 पेपर मिळाल्याचे सांगण्यात आले. त्यापैकी 20 पेपर जुने असून त्यात पाच पेपर टीईटीचे असल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी या पथकाने अटक केलेल्या रिंकू जितेंद्रसिंग याने सोलापूरच्या पवार याने काही विद्यार्थ्यांचे कागदपत्रे पुरवलेले असल्याचे सांगितल्याने ही कारवाई झाल्याचे सांगण्यात येत आहे. पवार हा स्वतः बीएससी बीएड झालेला असून त्याने काही वर्ष शिक्षक म्हणूनही काम केले आहे. टीईटी पेपरफुटी प्रकरण सोलापूरपर्यंत आल्यामुळे शिक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे.