March 10, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

झेडपी शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणार गुणवत्तापूर्ण गणवेश

सोलापूर : जिल्हा परिषद शाळांमधील मुलांना गुणवत्तापूर्ण गणवेश मिळावेत यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून प्रयत्न व्हावेत,  अशी मागणी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे करण्यात आल्याचे स्पष्टीकरण सोलापूर गारमेंट असोसिएशनचे प्रेसिडेंट राजू शहा यांनी दिले आहे.

गारमेंट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतेच शिक्षणमंत्री केसरकर यांची भेट घेतलेली आहे. शालेय शिक्षण विभागामार्फत जिल्हा परिषद व मनपा, नगरपालिका शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांसाठी गणवेशासाठी शाळांकडे पैसे दिले जातात. शालेय समितीमार्फत या गणवेशाची खरेदी होते. पण बरेच गणवेश अत्यंत खराब स्थितीत असल्याचे दिसून येते. गणवेशाची गुणवत्ता  वाढविण्यासाठी शालेय शिक्षण विभागामार्फत प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे मत पदाधिकाऱ्यांनी मांडले. याला शिक्षणमंत्री केसरकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे शहा यांनी स्पष्ट केले.

सोलापूर गारमेंट उद्योग वाढीसाठी सरकारने मोठी मदत केली आहे. गारमेंट उद्योगात सुमारे 40,000 कामगारांचा रोजगार आहे. गुणवत्तापूर्ण कामामुळे सोलापूरला इतर राज्यातूनही मोठी मागणी वाढली आहे, असे शहा यांनी स्पष्ट केले.