सोलापूर : नागपूरप्रमाणे सोलापुरात एकही शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचारी मान्यता बोगस नाही असे स्पष्टीकरण माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी सोमवारी दिले.
नागपूरमध्ये बोगस शिक्षक मान्यतेचा प्रकार बाहेर आल्यानंतर अनेकांवर कारवाई झाली आहे. यापूर्वी सोलापूरच्या माध्यमिक शिक्षण विभागाने बोगस मान्यता दिल्याची तक्रार शिक्षक संघटनांनी केली होती. तक्रार देऊन दोन महिने उलटले तरी शिक्षणाधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केला होता. त्यामुळे शिक्षणाधिकारी जगताप यांनी सोमवारी शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करून याबाबत चर्चा केली व त्यांच्या शंकांचे निरसन केले. याबाबत स्पष्टीकरण देताना माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप म्हणाले की बोगस मान्यताबाबत शिक्षक संघटनांनी तक्रार दिली आहे. यावरून चौकशी करून वरिष्ठांना यापूर्वीच अहवाल सादर केला आहे. बोगस मान्यता दिल्याचा एकही प्रकार उघड झालेला नाही. पण काही मान्यतामध्ये अनियमितता झाल्याचे दिसून आले आहे. यामध्ये जावक नोंद नसणे, अनेक कागदपत्रांची त्रुटी पूर्तता न करताच मान्यता देणे असे प्रकार घडल्याचे दिसून येत आहे. याबाबत तसा अहवाल वरिष्ठ कार्यालयाला सादर केला आहे. त्यामुळे आता पुढील निर्णय उपसंचालक कार्यालयामार्फत होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कारभार होणार ऑनलाईन
राज्यातील सर्व माध्यमिक शिक्षण विभागाचा कारभार ऑनलाईन होणार आहे शिक्षण आयुक्तांनी तशा सूचना दिल्या आहेत. सोलापूर माध्यमिक शिक्षण विभागाने कारभार ऑनलाईन करण्यासाठी यापूर्वीच तयारी केली आहे.यासाठी आणखी चार कर्मचारी व तितक्याच संगणकाची आवश्यकता आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्याकडे चार कर्मचाऱ्यांची मागणी केली आहे. माध्यमिक शिक्षण विभागाचा कारभार ऑनलाईन होण्यात सोलापूरचे कार्यालय राज्यात अग्रेसर ठरेल असा विश्वास शिक्षणाधिकारी जगताप यांनी व्यक्त केला.

More Stories
सोलापूर मनपा स्थायी समिती सभापतीपदी रंजीता चाकोते बिनविरोध
राज्यातील सर्व महिलांना लखपती दीदी बनविणार: जयकुमार गोरे
तुम्हाला बैलगाडी, घोंगडी हवी आहेत का? मग या ठिकाणी भेट द्या