सोलापूरजिल्हा परिषदशिक्षण

झेडपीच्या शाळेतील मुलांना पहिल्याच दिवशी मिळणार गणवेष व पुस्तके

आठवडाभरात शाळांची होणार साफसफाई

सोलापूर : शाळेच्या पहिल्याच दिवशी जिल्हा परिषद मराठी, कन्नड, उर्दू माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना गणवेश व नवीन पुस्तके देण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी दिली.

सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 2700 शाळांमधून सुमारे दोन लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यंदा 16 जून पासून नवीन शैक्षणिक सत्राला सुरुवात होत आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे जोरदार स्वागत केले जाणार आहे. त्याचबरोबर शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व पुस्तके दिली जाणार आहेत. समग्र शिक्षण अभियानातून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शासनातर्फे मोफत गणवेश व पुस्तके दिली जातात त्याचबरोबर सर्व मुलींनाही शासनाने ही सोय दिली आहे. इतर मुलांनाही गणवेश देण्यासाठी राज्य शासनाने गेल्या तीन वर्षापासून मदत केली आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याच्या गणवेशासाठी सहाशे रुपये शासनाने शालेय समितीच्या खात्यावर जमा केले आहेत. यातून दोन गणवेश घेण्याची प्रक्रिया शालेय समिती स्तरावर सुरू झाली आहे.

सोलापूर शहराबरोबरच आठ तालुक्यांसाठी पुस्तके आले आहेत. उर्वरित तीन तालुक्यांसाठी पुस्तके येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. गतवर्षी विद्यार्थ्यांना गणवेश देण्यास विलंब झाला होता. शासनाने राज्यस्तरावर कापड पुरविण्याचा निर्णय घेतला होता. चांगल्या दर्जाचे कापड शासनाने पुरविले खरे पण शिलाई करून विद्यार्थ्यांना गणवेश मिळेपर्यंत बऱ्याच अडचणी आल्या. त्यामुळे यंदा पूर्वीप्रमाणेच शालेय समिती स्तरावरच गणवेश घेण्याचा निर्णय झाला आहे. त्याप्रमाणे निधीचे वाटप झाले आहे. जिल्हा समितीने ठरवलेला एक रंग तर शालेय समितीचा एक रंग असे दोन गणवेश विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. 16 जूनला शाळा सुरू होणार आहेत. त्यामुळे येत्या आठवडाभरात शाळांची साफसफाई करण्याच्या सूचना शिक्षकांना देण्यात आल्या आहेत. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी शाळा सजविण्यात येणार आहेत. विविध उपक्रमाद्वारे शाळा प्रवेशाचं स्वागत करण्यासाठी शिक्षकांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button