सोलापूर : अक्कलकोट तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील यांनी शिक्षण अधिकाऱ्यावर ‘हात” उचलल्याचे सीसी कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये स्पष्ट झाले आहे. मल्लिकार्जुन पाटील हे स्वतःच्या संस्थेत स्वतः शिक्षक असताना शिक्षणाधिकाऱ्यासमोर त्यांनी केलेले हे कृत्य आता महागात पडणार आहे.
30 जून रोजी जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्याच्या कार्यालयात अक्कलकोट तालुका काँग्रेसचे अध्यक्ष व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मल्लिकार्जुन पाटील यांनी गोंधळ घातला होता. आपल्या संस्थेतील शिक्षकांचे प्रस्ताव मंजुरीबाबत हेलपाटे मारून हे काम होत नसल्यामुळे त्यांनी हा संताप व्यक्त केला अशी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्याच्या कार्यालयाला टाळे लावण्याचाही प्रयत्न केला होता. यावेळी शिक्षणाधिकारी जगताप हे न्यायालयीन कामासाठी बाहेर गेले होते . गोंधळाची माहिती मिळताच माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप हे कार्यालयात आले. यावेळी पाटील यांनी त्यांच्याबरोबर बराच वेळ वाद घातला. यानंतर बराच वेळ ते कार्यालयात बसून होते. शाब्दिक चकमकीवेळी ते शिक्षणाधिकाऱ्यांच्या अंगावर धावून गेल्याचे सीसी कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये दिसून आले आहे. या घटनेबाबत सदर बझार पोलीस ठाण्यात पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर पाटील हे पोलिसांसमोर हजर झाले असून चांगल्या वागणुकीच्या बॉण्डवर त्यांना जामीन देण्यात आला आहे. पोलिसांनी माध्यमिक शिक्षण विभागाला कार्यालयातील सीसी कॅमेऱ्याचे फुटेज मागितले होते. शिक्षण विभागाने हे फुटेज शुक्रवारी पोलिसांना सादर केले आहेत. सीसी कॅमेऱ्याच्या फुटेजमुळे पाटील यांचा पाय आणखी खोलात गेला आहे.
या घटनेनंतर पाटील यांच्या बाबतीत अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत. स्वतःच्या शिक्षण संस्थेत ते स्वतः शिक्षक म्हणून नोकरी करतात. याचा पगारही ते उचलतात. शाळेवर शिकवण्यासाठी ते कधी गेले व तालुक्याच्या राजकारणाला कधी वेळ दिला, आता हा संशोधनाचा विषय झाला आहे. त्यांच्या संस्थेत करपे व स्वामी हे कर्मचारी काम करतात. ते कामावर येत नाहीत म्हणून त्यांचा पगार पाटील यांनी बंद केला आहे. याबाबत त्यांनी शिक्षण विभागाकडे तक्रार केली आहे. तसेच यातील एकाने कर्नाटक सरकारकडून अनुदान घेऊन शाळा काढण्याचा प्रस्ताव दिला होता. अनुदान मिळाल्यानंतरही शाळा उभी केली नाही. कर्नाटक सरकारच्या पत्रानंतर तहसीलदारांनी संबंधित कर्मचाऱ्याविरुद्ध वसुलीची नोटीस बजावली आहे. कर्नाटक सरकारची 13 लाखाची वसुली आहे. त्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून ही वसुली करण्यात येणार आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने त्यांचा पगार चालू करण्याबाबत संस्थेला कळविले आहे. तरीही संस्थेने त्यांचा पगार काढलेला नाही. हे दोघेही शाळेत येत नाहीत त्यामुळे त्यांचा पगार काढणार नाही असे पाटील यांचे म्हणणे आहे. या वादामुळे शिक्षण विभागाने त्यांच्या संस्थेची पुढील कामे थांबविली आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही ही वसुली होत नसेल तर शाळेची मान्यता रद्द करण्याची पुढील कारवाई होणार आहे. अशी वस्तुस्थिती असताना कामासाठी पाटील यांनी दबाव तंत्राचा वापर केल्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. शिक्षण अधिकाऱ्यापुढे एखाद्या शिक्षकाने गैरवर्तन करणे हे नियमबाह्य आहे. शिक्षकच असे वागू लागले तर सरकारी कार्यालयात कर्मचारी कसे काम शकतात असा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. माध्यमिक शिक्षण कार्यालयाला पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
मी माझ्या संस्थेचा संचालक व सचिव आहे. मी माझ्या संस्थेत शिक्षक असलो तरी संस्थेच्या कामासाठी मला शिक्षण विभागात जावे लागते. शिक्षण कार्यालयाने दोन कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत विचारणा केली आहे. ते कर्मचारी कामावर येत नाहीत. त्यामुळे पगार काढलेला नाही. कोणाच्यातरी सांगण्यावरून आमची कामे आडविल्यामुळे मी संताप व्यक्त केला.
मल्लिकार्जुन पाटील

More Stories
रेड कार्पेट; सोलापूर झेडपी अध्यक्ष निवडीची जय्यत तयारी
सांगोल्यात दहावीच्या भूगोलच्या पेपरची चोरी; तरीपण ठरल्याप्रमाणे विद्यार्थ्यांची परीक्षा होणार
अखेर.. सोलापूर झेडपीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष ठरले