सोलापूरजिल्हा परिषदशिक्षण

सोलापूर जिल्ह्यातील 7 हजार शिक्षकांचे शालार्थ आयडी होणार ऑनलाइन

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील 7 हजार शिक्षकांचे शालार्थ आयडी व मान्यता ऑनलाइन करण्यात येणार असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी दिली.

सध्या राज्यात नागपूर विभागातील शालार्थ आयडी घोटाळा गाजत आहे. या प्रकरणात शिक्षणाधिकारी व कर्मचाऱ्यांना अटक झाली आहे. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून राज्यभर शिक्षण विभाग अलर्ट झाला आहे. शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह  यांनी हे प्रकरण खूपच गांभीर्याने घेतले आहे. राज्यातील शिक्षण अधिकाऱ्यांना त्यांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मान्यता व शालार्थ आयडीचे प्रकरणे ऑनलाइन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात माध्यमिक शाळांमध्ये कार्यरत असणाऱ्या सात हजार शिक्षकांच्या शिक्षक मान्यता व शालार्थ आयडी तपासून ऑनलाईन करण्यात येणार आहेत. पुण्याचे शिक्षण उपसंचालक डॉक्टर मोरे यांनीही याबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. त्यामुळे लवकरच माध्यमिक शिक्षण विभागातर्फे ही मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी सांगितले. माध्यमिक शिक्षण विभागात यापुढे यासंबंधी येणाऱ्या सर्व पाहिले ऑनलाइन वर नोंद केल्या जातील असेही त्यांनी स्पष्ट केले.

“त्या’ प्रकरणावर होणार सुनावणी

सोलापूर माध्यमिक शिक्षण विभागात यापूर्वी नियुक्त झालेल्या प्रभारी व इतर शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलेल्या मान्यताबाबत शिक्षक संघटनांनी तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे या मान्यता प्रलंबित ठेवण्यात आल्या आहेत. यामुळे अनेक शिक्षकांचा जीव टांगणीला लागला आहे. असे शिक्षक दररोज शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे हेलपाटे मारताना दिसत आहेत. शिक्षण उपसंचालक डॉ. मोरे यांच्यासमोर या मान्यतावर सुनावणी घेऊनच शालार्थ आयडीकडे शिफारस करण्यात येणार आहे. या मान्यतांच्या सुनावणीसाठी संबंधित शाळेचे शिक्षक संस्थाचालक मान्यता देणारे शिक्षणाधिकारी यांना बोलावण्यात येणार आहे. या सर्वांसमक्ष खातरजमा करूनच पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button