सोलापूरआरोग्यजिल्हा परिषदशिक्षण

झेडपीचे सीईओ जंगम यांनी घेतली शिक्षण, आरोग्य विभागाची झाडाझडती

सोलापूर : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम ॲक्शन मोडवर आले असून मंगळवारी सकाळी त्यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण आणि आरोग्य विभागाचे झाडाझडती घेतली. जागेवर हजर नसणाऱ्या कर्मचाऱ्यांचे विनावेतन करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

अलीकडच्या महिन्यात शिक्षकांच्या तक्रारी खूप  वाढल्या आहेत. त्रस्त झालेले शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी थेट सीइओच्या केबिनकडे येऊन गर्दी करत आहेत. यामुळे कामकाजावर परिणाम होत आहे. या दोन्ही विभागातील कर्मचारी जागेवर नसल्याने अनेक समस्या निर्माण होत असल्याच्या तक्रारी आहेत. याची दखल घेत सीईओ जंगम यांनी मंगळवारी सकाळी या तिन्ही विभागात अचानकपणे फेरफटका मारला. अधिकाऱ्यांची हजेरी घेऊन विभागात फिरून टेबलावर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या कामांबरोबर त्यांच्यावर असलेल्या जबाबदारीची त्यांनी माहिती घेतली. प्रलंबित कामाबाबत त्यांनी कर्मचाऱ्यांना त्यांनी फैलावर घेतले. जे कर्मचारी जागेवर हजर नव्हते त्यांच्याबाबत चौकशी करून त्यांच्यावर विना वेतनाची कारवाई करण्याचे आदेश दिले. सीईओच्या अजेंड्यावर माध्यमिक शिक्षण  विभाग होता. या विभागात अधिकारी हजर नव्हते. शिक्षण विभागाचे अधिकारी आंदोलनावर असल्याचे सांगण्यात आले. माध्यमिक शिक्षण विभागात दिलेल्या कर्मचाऱ्यांचे कामकाज व जबाबदाऱ्या तपासून त्यांनी आपला दौरा आटोपता घेतला. आरोग्य विभागातही फेरफटका मारून कर्मचारी काय काय कामकाज करीत आहेत याची तपासणी केली. सीईओ कुलदीप जंगम यांच्या अचानक भेटीमुळे शिक्षण व आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. सकाळी कामासाठी आलेले लोक व खुर्चीवर हजर नसलेले कर्मचारी पाहून सीईओ कुलदीप जंगम यांनी दांडी बहाद्दरांची गंभीर दखल घेतली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button