सोलापूरजिल्हा परिषदजिल्हाधिकारी कार्यालय

सोलापुरात घरकुलाला मिळणार 5 ब्रास मोफत वाळू

वाढीव अनुदानात सौर ऊर्जेसाठी 15 हजाराची तरतूद

सोलापूर : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा २ अंतर्गत मंजुर करण्यात आलेली घरकुलाना वाढीव 50 हजार अनुदानाबरोबरच मोफत 5 ब्रास वाळू उपलब्ध करून देण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. सुधीर ठोंबरे यांनी दिली.

दि.२२ फेब्रुवारी रोजी एकाच दिवशी एका क्लिकवर सोलापूर जिल्ह्यातील 62 हजार 900 घरकुल मंजुरीचे पत्र व अनुदान वाटप कार्यक्रम नियोजन भवन सोलापूर येथे पार पडला. यावेळी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी महाराष्ट्र शासनाच्या 100 दिवसीय कार्यक्रमात घरकुले पूर्ण करणे, हा शासनाचा महत्वकांक्षी विषय असल्याचे सांगितले होते. सर्व लाभार्थी यांनी लवकरात लवकर घरकुलाचे बांधकाम पुर्ण करावे व त्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना व स्वच्छ भारत मिशन योजनेतील अनुदानाचा अतिरिक्त फायदाही सर्व लाभार्थी यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी केले होते.प्रकल्प संचालक डॉ.सुधीर ठोंबरे यांनी सांगितले की, महाराष्ट्र राज्यात 20 लाख घरकुलाचे मंजूरी आदेश व 10 लाख लाभार्थी यांनी अनुदान अदा करण्यात येत आहे. त्यात सोलापूर जिल्ह्यात 62 हजार 900 घरांना मंजूरी आदेश व 43 हजार 800 लाभार्थी यांना पहिला हप्ता अनुदान वितरण केलेले आहे. घरकुलाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी लाभार्थ्यांकडे जागेची अडचण व वाळूची अडचण सांगितली जात आहे. वाळूची अडचण सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या पुढाकाराने वारंवार बैठक झाल्या. गौण खनिज विभागाकडून जिल्ह्यातील वाळू घाटामध्ये काढण्यात आलेली वाळू लाभार्थ्यांना देण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे. एका लाभार्थ्यास पाच ब्रास वाळू मोफत दिली जाईल. ग्रामसेवक व तलाठी यांच्यामार्फत संबंधित लाभार्थ्यांना मंजूर वाळूचे पास दिले जातील व विहित कालावधीत संबंधित लाभार्थ्याने जवळच्या घाटावरून ही वाळू स्वतः वाहतूक करून न्यायची आहे. राज्यात सर्वत्र सध्या पावसाचा जोर आहे त्यामुळे नद्यांना पाणी आले आहे. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर लिलाव झालेल्या वाळूघाटावरून लाभार्थ्यांना ही वाळू उपलब्ध करून देण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न असल्याचे प्रकल्प संचालक डॉ सुधीर ठोंबरे यांनी सांगितले. नवीन लाभार्थ्यांना शासनाने मंजूर केलेले अधिकचे पन्नास हजार अनुदान मिळणार आहे. यातील पंधरा हजार अनुदान हे घरकुलाच्या छतावर सौर ऊर्जा बसविण्यासाठी देण्यात येणार आहे.

आवास ॲपवर जा…

ज्यांना अद्याप घरकुलाचा लाभ मिळालेला नाही अशांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. ज्याला घर नाही असा लाभार्थी स्वतः या सर्वेक्षणमध्ये सहभागी होऊ शकतो. मोबाईल मधील प्ले स्टोअर ॲप्लिकेशनमध्ये आवास प्लस हे आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून लाभार्थ्याने स्वतःची माहिती भरायची आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button