May 13, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

सोलापूर झेडपीत विनंती बदलीवरून कर्मचाऱ्यांची नाराजी

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांच्या विनंती व प्रशासकीय बदल्यांना अखेर मंगळवारी मुहूर्त लागला पण विनंती बदलीवरून कर्मचारी नाराज झाले आहेत. नाराज कर्मचारी बुधवारी जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना भेटून आपली भूमिका मांडणार असल्याचे कर्मचारी संघटनांच्या नेत्यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या पात्र कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या व विनंती बदली प्रक्रियेला मंगळवारी सुरुवात करण्यात आली. वेळापत्रकानुसार ही प्रक्रिया सायंकाळी उशिरा सुरू करण्यात आली. त्यामुळे कर्मचारी ताटकळत थांबले होते. समायोजनाद्वारे प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या. त्यात सात संवर्गातील वीस प्रशासकीय बदल्या तर पाच विनंती बदल्या करण्यात आल्या. यात सामान्य प्रशासन विभागातील 12 प्रशासकीय व एक विनंती अशा तेरा बदल्या करण्यात आल्या. महिला व बालकल्याण विभागातील अंगणवाडी पर्यवेक्षिका संवर्गातील पाच प्रशासकीय व एक विनंती अशा सह बदल्या करण्यात आल्या आहेत. प्राथमिक शिक्षण विभागातील शिक्षण विस्तार अधिकारी संवर्गात एक विनंती बदली झाली असून केंद्रप्रमुख संवर्गात एक प्रशासकीय व दोन विनंती अशा चार बदल्यांचे आदेश काढण्यात आले. वरिष्ठ सहाय्यक संवर्गात दोन प्रशासकीय बदल्यचे आदेश देण्यात आले आहेत.

विनंती बदलीसाठी 89 कर्मचाऱ्यांनी अर्ज केले होते त्यातील एक अर्ज मान्य करण्यात आला तर उर्वरित अर्ज फेटाळून लावत नकार अर्ज भरून घेण्यात आले. यामुळे विनंती अर्ज बदलीसाठी आलेले कर्मचारी नाराज झाले. प्रशासनाच्या भूमिके विरोधात त्यांनी पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केली. त्यानंतर कर्मचारी संघटनांच्या बैठका झाल्या. या भूमिकेविरोधात बुधवारी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना भेटून लेखी निवेदन देण्याचे ठरले आहे. झेडपी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची कार्यवाही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अधिकारात असल्याने नियमानुसार बदल्या करण्यात याव्यात अशा सूचना पदाधिकाऱ्यांनी यापूर्वीच दिल्या होत्या. पण कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केल्यामुळे पदाधिकाऱ्यांनीही याबाबत आश्चर्य व्यक्त करून या बदल्याबाबत अभ्यास करणार असल्याचे सांगितले.

प्रतिनियुक्तीचा मोठा घोळ…

काही कर्मचाऱ्यांनी पदोन्नती व पंचायत समितीला बदली घेत पुन्हा मुख्यालय गाठले आहे. याबाबत विभागीय आयुक्तांना प्रस्ताव कोणी दिले याबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे. जवळपास अशा 30 नियुक्त्या झाल्या असून त्यामुळे पंचायत समितीकडून मुख्यालयात येऊ इच्छिणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अन्याय झाल्याची भावना संघटनानी व्यक्त केली आहे.

जंगम झाले होते हिरो…

झेडपी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची पारदर्शक प्रक्रिया राबवून यापूर्वीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम कर्मचाऱ्यांसाठी हिरो ठरले होते. बदलीपात्र कर्मचाऱ्यांची यादी तयार करून त्यांनी स्वतः तपासून पाहिली होती. एकाच जागी अनेक वर्ष ठाण मांडणाऱ्यांना त्यांनी दुसरा रस्ता दाखविला होता. समायोजनाद्वारे नियुक्त्या दिल्यामुळे बदलीनंतर एकही तक्रार आली नव्हती. त्यामुळे जंगम यांचे मोठे कौतुक झाले होते. नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी जैन यांनी मात्र ही संधी गमावल्याची भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.