सोलापूरजिल्हा परिषदशिक्षण

सोलापूर जिल्ह्यातील २३ जिल्हा परिषद शाळांना इयत्ता पाचवीची मंजुरी

सोलापूर : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गावातच दर्जेदार उच्च प्राथमिक शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सोलापूर जिल्हा परिषद प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शासनाच्या दि. १५ मार्च २०२४ रोजीच्या शासन निर्णयातील (GR) निकषांची पूर्तता करणाऱ्या जिल्ह्यातील २३ जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये इयत्ता पाचवीचा वर्ग सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे हजारो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रवास अधिक सुलभ होणार असून, ग्रामीण शिक्षणाला नवी दिशा मिळणार आहे.

शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार-सावंत यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून, त्यांच्या शिफारशीनुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी वर्गवाढीस प्रशासकीय मान्यता दिली आहे. शासन निर्णयातील सर्व अटी व निकषांची पडताळणी करूनच हा निर्णय घेण्यात आला आहे.

यापूर्वी अनेक गावांतील विद्यार्थ्यांना चौथीनंतर पुढील शिक्षणासाठी शेजारच्या गावात जावे लागत होते. वाहतुकीची अडचण, आर्थिक परिस्थिती आणि सुरक्षिततेच्या कारणांमुळे अनेक विद्यार्थी, विशेषतः मुली, शिक्षण अर्धवट सोडत असल्याची समस्या निर्माण होत होती. आता गावातच पाचवीचा वर्ग उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांची शाळा गळती रोखण्यास मोठी मदत होणार आहे. तसेच पालकांचा आर्थिक व मानसिक ताणही कमी होणार आहे. या निर्णयामुळे बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार (RTE) कायद्याचा उद्देश अधिक प्रभावीपणे साध्य होणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला घराजवळच शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या शासनाच्या धोरणाला यामुळे बळ मिळणार आहे.या निर्णयाचे जिल्हाभरातून स्वागत होत आहे.

“ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गावातच गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी २३ जिल्हा परिषद शाळांमध्ये इयत्ता पाचवी सुरू करण्यास मंजुरी मिळाली, ही आनंदाची बाब आहे. या निर्णयामुळे शाळा गळती कमी होऊन विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला मोठे बळ मिळेल. शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी आणि प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी आमचे प्रयत्न यापुढेही सुरू राहतील.”ग्रामीण भागातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, हा आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न राहणार आहे.

–  चेतनसिंह केदार-सावंत
सभापती,

शिक्षण व आरोग्य समिती, जिल्हा परिषद सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button